भाजपांतर्गत वादाला फुटले तोंड : उत्पल पर्रीकरांच्या बॅनर्समुळे बाबुशना हादरे
प्रतिनिधी /पणजी
उत्पल पर्रीकर यांचे पणजीत सर्वत्र पोस्टर्स आणि बॅनर्स लागले आणि पणजीतील मूळ भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला. विद्यमान आमदार बाबुश मोन्सेरात भाजपमध्ये आल्यापासून मूळ भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱयांच्या झालेल्या केंडमाऱयावर स्व. मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांचे प्रत्यक्षात मैदानात उतरणे हा एक उत्तम उतारा ठरणार आहे. परंतु या साऱया पार्श्वभूमीवर खुद्द राजधानी पणजीत भाजपमध्ये दोन उभे तट निर्माण झाल्याचे आता उघड झाले.
राजधानी पणजीचे राजकारण कूस बदलू लागल्याची चाहूल उत्पल पर्रीकर यांच्या बॅनर्समुळे लागली. बाबुश हे नेहमीच बिनधास्त असतात. भाजपमधील नेत्यांच्या म्हणण्यानुसार बाबुशने पणजी मतदारसंघातील एकेका नरकासुर पथकाला कोणी नाही दिली एवढी रक्कम दिलेली आहे. हा आकडा किमान रु. 1 लाख व त्याही पुढे जातो असे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे नरकासुर प्रतिमा बनविणारी मंडळीही बाबुशवर बेहद्द खूष आहे. ही पथके व त्यातील सहभागी मंडळी बाबुशवर खूष झाली म्हणून काही बाबुश मोन्सेरात यांचा पणजीवर पुन्हा अधिराज्य गाजविण्याचा पराक्रम साध्य होईलच असे नाही. कारण पणजीत अनेक घटक आहेत त्यातील मूळ भाजपची माणसे आजही बाबुशबरोबर नाहीत हे बाबुशने देखील मान्य केले.
आता प्रश्न उपस्थित झाला तो पर्रीकरांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांच्यामुळे भाजपसमोर एक गंभीर प्रसंग निर्माण झाला आहे. पर्रीकरांच्या चिरंजीवाने भाजपचा त्याग करणे हे भाजपला ऐन निवडणुकीत परवडणार नाही. मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आता भावनिक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. त्यातच मोन्सेरात यांनी आपले चिरंजीव रोहितला महापालिका सिंहासनावर बसविले. पत्नी जेनिफर मोन्सेरात मंत्री आणि बाबुश आमदार, पीडीए चेअरमन. ही घराणेशाही वाढतेय आता बस्स झाले! असा सूर मूळ भाजप कार्यकर्त्यांत निर्माण झाला. गेले कित्येक दिवस भाजपांतर्गत निर्माण झालेल्या वादाला मंगळवारी तोंड फुटले.
उत्पल भेटले फडणवीसांना
भाजपचे गोवा निवडणूक प्रमुख देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी दुपारी गोव्यात पोहोचले. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत भाजप नेत्यांबरोबर बैठकही घेतली नंतर फडणवीस यांनी प्रत्येक आमदार व मंत्र्यांबरोबर स्वतंत्र बैठका घेतल्या. त्यांची मते जाणून घेतली. त्याचबरोबर उत्पल पर्रीकर यांनीही त्यांची भेट घेऊन पणजीसाठी आपल्याला उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी केली.
पणजीत झळकले स्व. मनोहर पर्रीकर यांचे बॅनर्स
तत्पूर्वी पणजीतील अनेक महत्वाच्या चौकात मनोहर पर्रीकर यांच्या फोटोंचे होर्डिंग्स झळकले व त्यावर केवळ त्यांनी जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. आता हे होर्डिंग्स काढून टाकले तरी मनपा अडचणीत येईल व ठेवले तर बाबुशला अडचण. असा दुहीपेच मनपासमोर निर्माण झाला. मात्र या होर्डिंग्समुळे पुन्हा एकदा पणजीत ‘पर्रीकर’ झळकले आणि पणजीकर मतदारांमध्ये उत्साह संचारला.
उत्पलला या निवडणुकीत उतरवायचेच असा चंग मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी बांधला. भाजपने जर उमेदवारी नाकारली तर संपूर्ण गोव्यात एक चुकीचा संदेश जाईल आणि भाजपला ही निवडणूक संकट निर्माण करणारी ठरेल. उत्पलची निवडणूक ही केवळ मनोहर पर्रीकर आणि मनोहर पर्रीकर एवढय़ाच विषयाला गुरफटून पुढे घेऊन जाणारी ठरणार आहे. पर्रीकरांना मानणारा सर्वच जाती धर्मातील वर्ग पणजीत आहे. पर्रीकरांची उणीव कोणीही भरुन काढणार नाही याची जाणीव पणजीकरांना झाली आणि उत्पलच्या पणजीतील होर्डिंग्सनी प्रचंड खळबळ उडवून दिली. भाजपसमोर अडचणींचा एक मोठा डोंगर उभा केला आणि मोन्सेरात याच्या सम्राज्यालाच एका होर्डिंग्सनी एवढे हादरे दिले तर ऐन निवडणुकीत होणार काय? हा प्रश्न पुढील काही दिवस चर्चेला येणार आहे मात्र उत्पलची राजकारणातील एंट्री गोव्याच्या भवितव्यातील राजकारणाची ही नांदी ठरणारीच असावी!