प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्ह्यामध्ये दि. 23 ऑक्टोबर 2021 अखेर कोविड लसीकरण कार्यक्रमातंर्गत 19,46,733 नागरीकांना लसीचा पहिला डोस 8,33,858 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आता दि. 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान कोविड 19 लसीकरण कार्यक्रमातंर्गत मिशन युवा स्वास्थ्य कोविड लसीकरण मोहिम घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.
मिशन युवा स्वास्थ्य कोविड लसीकरण मोहिमेदरम्यान सातारा जिल्ह्यातील पहिला व दुसरा डोस देय असलेल्या लाभार्थीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्राधान्याने कोविड लसीकरण करण्यासाठी 18 वर्षावरील सर्व पात्र विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे महाविद्यालयामध्ये विशेष कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेचा लाभ जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी केले आहे.