वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा 28 वर्षीय क्रिकेटपटू उन्मुक्त चंदने भारतीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. अमेरिकन क्रिकेटकडे मोर्चा वळवण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला. उन्मुक्त चंदचे गेल्या एप्रिलपासून अमेरिकेत वास्तव्य आहे. 19 वर्षाखालील वयोगटातील आयसीसी विश्व करंडक क्रिकेट स्पर्धा भारताने 9 वर्षांपूर्वी जिंकली होती. या संघामध्ये उन्मुक्तचा समावेश होता.
आयसीसी विश्व युवा चषक क्रिकेट स्पर्धेतील भारताच्या विजेतेपदाला 9 वर्षे पूर्ण होण्यासाठी 13 दिवस बाकी असताना उन्मुक्त चंदने आपल्या ट्विटरवर निवृत्तीच्या निर्णय जाहीर केला. भविष्य काळात आपण अमेरिकेतील टी-20 लीग स्पर्धेत खेळणार असल्याचे तो म्हणाला.
उन्मुक्तने अलीकडेच अमेरिकेतील मायनर लीग क्रिकेट स्पर्धेत सिलीकॉन व्हॅली स्ट्रायकर्स संघाची 2021 च्या क्रिकेट हंगामासाठी नवा करार केला आहे. अमेरिकेतील मायनर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धा टोयाटोने पुरस्कृत केली असून या स्पर्धेत अमेरिकेतील 27 संघ सहभागी होत असून एकूण 200 सामने खेळविले जाणार आहेत.
उन्मुक्त चंदचा भारतीय युवा संघातील आणखी एक सहकारी स्मित पटेलने चालू वर्षांच्या प्रारंभी अमेरिकन क्रिकेटमध्ये दाखल होणे पसंत केले होते. तोच कित्ता उन्मुक्तने येथे गिरवला. 9 वर्षांपूर्वी झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक युवा क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध स्मित पटेलची नाबाद 111 धावांची खेळी अविस्मरणीय ठरली होती. उन्मुक्त चंदकडे भारत अ संघाचे नेतृत्व होते.
मध्यंतरी दिल्ली संघाच्या कर्णधारपदावरून उन्मुक्त चंदला डच्चू दिला गेला. शिवाय, 2017-18 क्रिकेट हंगामात त्याला दिल्ली रणजी संघातून वगळण्यात आले होते. यानंतर उन्मुक्तने दिल्ली संघाला रामराम ठोकत 2019-20 क्रिकेट हंगामात उत्तराखंड संघात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. पण, तेथेही त्याची कामगिरी फारशी समाधानकारक नव्हता.