भारतातही सीरमच्या चाचणीला पुन्हा गती मिळणार
लंडन / वृत्तसंस्था
ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राजेनेकाने कोरोना लसीच्या चाचण्या पुन्हा सुरु केल्या आहेत. साईड इफेक्ट्स झालेल्या स्वयंसेवकाची योग्य तपासणी केल्यानंतर ब्रिटनमधील आरोग्य नियंत्रकांनी पुन्हा ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचण्या सुरु करण्याची परवानगी दिल्यामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे भारतातही सीरमच्या चाचणीला पुन्हा गती मिळणार आहे.
ब्रिटनमध्ये मानवी चाचणीत ऑक्सफर्डच्या लसीचा डोस दिल्यानंतर एक व्यक्ती आजारी पडला होता. त्यामुळे ऍस्ट्राजेनेकाने या चाचण्या जगभरात स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. लसीचा डोस दिल्यानंतर या व्यक्तीवर दुष्परिणाम कसे झाले? त्याचा तज्ञांच्या स्वतंत्र पथकांकडून तपास सुरु झाला होता. जगभरात आतापर्यंत 18 हजार स्वयंसेवकांना या लसीचा डोस देण्यात आला आहे. चाचणी दरम्यान एक व्यक्ती आजारी पडल्यामुळे चाचणी स्थगित करण्यात आली होती. “मोठय़ा प्रमाणावर जेव्हा चाचणी होते, तेव्हा काही जण आजारी पडतात. लसीचा डोस घेतल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचे मूल्यमापन आवश्यक आहे’’ असे ऑक्सफर्ड विद्यापीठाने निवेदनामध्ये म्हटले आहे.