पालकमंत्री जगदीश शेट्टर यांची माहिती
वार्ताहर / हुबळी
वैद्यकीय चिकित्सेसाठी आवश्यक असणाऱया ऑक्सिजन उत्पादनात धारवाड जिल्हय़ाला स्वावलंबी बनविण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. विविध कंपन्यांच्या सहकार्याने जिल्हय़ातील विविध इस्पिळांमध्ये 6 ते 7 मेट्रीक टन क्षमतेची मेडिकल ऑक्सिजन उत्पादन केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर धारवाड जिल्हा राज्यात अग्रेसर ठरणार आहे, अशी माहिती पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी दिली.
कुंदगोळ तालुका इस्पितळ आवारात रविवारी प्रतिदिन 500 लिटर ऑक्सिजन क्षमतेच्या प्लांट निर्मितीचे भूमिपूजन केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. बळ्ळारीतून पुरवठा होणाऱया ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने राज्यातील सर्व जिल्हय़ांमध्ये ऑक्सिजन प्लांट स्थापनेवर भर दिला जात आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या इच्छाशक्तीमुळे विविध कंपन्यांनी सीसीआर निधी सरकारला दिला आहे. पीएम केअर निधीतून जिल्हय़ातील कुंदगोळसाठी तीन नवे व्हेंटिलेटर्स उपलब्ध झाले आहे. जिल्हय़ातील इस्पितळांमध्ये रिक्त असणाऱया जागांवर डॉक्टर, निमवैद्यकीय कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यासही राज्य सरकारने मंजुरी दिली आहे, अशी माहिती जगदीश शेट्टर यांनी दिली.
राज्यात 32 ऑक्सिजन प्लांटची निर्मिती : प्रल्हाद जोशी
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, आयओसीएल आणि एमपीएल या कंपन्यांच्या सहभागातून राज्यात 32 ऑक्सिजन प्लांट निर्माण करण्यात येत आहेत. धारवाड जिल्हय़ातील सर्व तालुक्यांमध्ये ऑक्सिजन प्लांट निर्माण होतील. जूनच्या अखेरीस या ठिकाणी ऑक्सिजन उत्पादन सुरू होणार आहे. कुंदगोळ तालुका इस्पितळात 25 ऑक्सिजन कॉन्सन्टेटर आहेत. कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी जिल्हा प्रशासन चोवीस तास सज्ज राहून कामे करीत आहेत. विविध संघ-संस्थांचेही सहकार्य मिळत आहे, असे ते म्हणाले.