केंद्र अन् राज्य सरकारच्या योजनांकरता एकच डिजिटल प्रोफाईल : सर्वांना होणार लाभ
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व प्रकारच्या योजना किंवा सेवांचा लाभ घेण्यासाठी आता एकच डिजिटल प्रोफाइल असणार आहे. ही व्यवस्था ऑगस्टपासून सुरू होणार असून याला ‘सिंगल साइन ऑन’ नाव देण्यात आले आहे. या व्यवस्थेच्या माध्यमातून एकाच आयडीद्वारे सर्वप्रकारच्या शासकीय सेवांचा लाभ घेता येणार आहे. म्हणजेच आता पुन्हा पुन्हा प्रमाणपत्राच्या प्रक्रियेला तोंड द्यावे लागणार नाही.
तसेच विविध सेवा आणि योजनांशी जोडण्यासाठी अनेक लॉगइन आयडी-पासवर्ड आठवणीत ठेवण्याची गरज भासणार नाही. इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाने केंद्र आणि राज्य सरकारांच्या सर्व योजना-सुविधांच्या एकीकरणासाठी पोर्टल/ऍप तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या पोर्टलवर एकदा साइन ऑन करावे लागेल. त्यानंतर युज ऑथेंटिकेशन होईल. पुढील काळात जीवनभर याच एका आयडीद्वारे सर्वप्रकारच्या योजनांचा लाभ घेता येणार आहे.
एकाच ठिकाणी मिळतील अनेक सुविधा
सिंगल साइन ऑन पोर्टलद्वारे शाळा, महाविद्यालयात प्रवेश, शैक्षणिक प्रमाणपत्र, वीज-पाण्याचे बिल भरणे, रेल्वे-विमानप्रवासाचे तिकीट, घरपट्टी, प्राप्तिकर विवरणपत्र, जीएसटी विवरणपत्र, व्यवसायाची अनुमती संबंधी सुविधा देखील मिळतील. शिष्यवृत्ती अर्ज, स्टार्टअप नोंदणी करण्याची सुविधा याच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे.
केवायसी अन् डिजिलॉकर
व्यवसाय संबंधी काही सेवांसाठी याच पोर्टल किंवा ऍपद्वारे वार्षिक अपडेशनसाठी वर्षात केवळ एकदा ओके बटन टिक करून पुष्टी करावी लागणार आहे. बँकिंग सेवांसाठी वापरली जाणारी केवायसी देखील याच्याशी जोडली जाणार आहे. सरकार डिजिलॉकरलाही या सुविधेशी जोडणार आहे.
उद्योजक अन् व्यावसायिकांना लाभ
ईज ऑफ डुइंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंगमध्ये सुधाराच्या दिशेने हे एक क्रांतिकारक पाऊल ठरणाल आहे. कारण या सेवेचा सर्वात मोठा लाभ उद्योजक आणि व्यावसायिकांना होणार असल्याचा दावा उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱयाने केला आहे. सद्यस्थितीत व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक प्रकारची मंजुरी मिळविण्यासाठी विविध कार्यालयांमध्ये अर्ज करावा लागतो. आतापर्यंत देशात राज्य पातळीवर केवळ राजस्थान सरकारने स्वतःच्या योजनांसाठी एसएसओ म्हणजेच सिंगल साइन ऑन आयडी अनिवार्य केला आहे. पालिका स्तरावर नवी दिल्ली महापालिकेने स्वतःच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना एसएसओ सुविधा दिली आहे.
पासपोर्टपासून गॅस कनेक्शनपर्यंत
पासपोर्ट, आधार, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, गॅस कनेक्शन, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, विवाह-जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, पीएफ, शस्त्र परवाना, व्यापार परवाना यासारखे दस्तऐवज जारी करण्यासाठी आतापर्यंत विविध कार्यालयांचे ऍप किंवा वेबसाइटवर अर्ज करावा लागत होता. विविध वेबसाइट्सवर वेगवेगळे लॉगन आणि पासवर्ड वापरले जात होते. आता या प्रकारापासून मुक्ती मिळणार आहे.
पूर्ण तपशील आपोआप नोंदला जाणार
सर्वात महत्त्वाचे फीचर ‘प्री-फिल्ड फॉर्म’ असेल. म्हणजेच एखाद्या सुविधेसाठी अर्ज करू इच्छित असल्यास अर्ज ओपन होताच वेगवेगळय़ा कॉलमध्ये अर्जदाराशी निगडित सर्व माहिती आपोआप भरली जाणार आहे. संबंधिताला केवळ ‘ओके’ बटन क्लिक करावे लागणार आहे.