गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी मांडले कर्नाटक पोलीस दुरुस्ती विधेयक
प्रतिनिधी/ बेंगळूर
ऑनलाईन जुगारावर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्याकरिता शुक्रवारी विधानसभेत कर्नाटक पोलीस दुरुस्ती विधेयक-2021 मांडण्यात आले. गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी हे विधेयक मांडले असून सोमवारी या विधेयकावर विधानसभेत चर्चेनंतर ते संमत होण्याची शक्यता आहे.
राज्यातील जनतेला जुगाराच्या व्यसनापासून मुक्त करण्यासाठी ऑनलाईन जुगार खेळणाऱयांवर कारवाई करण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे. संगणक, मोबाईल किंवा इतर संवहन साधनांच्या साहाय्याने खेळल्या जाणाऱया ऑनलाईन जुगारावर निर्बंध आणण्यासाठी हे विधेयक मांडण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपींवर विनाजामीन गुन्हा नोंदविण्याची तरतूद असणार आहे. या ऑनलाईन जुगार बंदी कायद्यांतर्गत लॉटरी व घोडेशर्यत वगळता सर्व प्रकारचे ऑनलाईन जुगार समाविष्ट असतील.
राज्यात भाजप सत्तेवर आल्यानंतर ऑनलाईन जुगारावर बंदी घालण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार मागील महिन्यात ऑनलाईन जुगारबंदीसाठी कर्नाटक पोलीस कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. आता शुक्रवारी यासंबंधीचे विधेयक विधानसभेत सादर करण्यात आले आहे. या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर ते संमत केले जाणार आहे.
विधेयक मांडल्यानंतर बोलताना गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र म्हणाले, राज्यात ऑनलाईन गॅब्लिंगवर बंदी घालण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. हे दुरुस्ती विधेयक लॉटरी आणि घोडेशर्यतीसाठी लागू असणार नाही. मात्र, ऑनलाईन जुगारामंध्ये गुंतलेले, त्यांना सहकार्य करणारे आणि आश्रय देणाऱयांना 6 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आणि 10 हजार रुपये दंड लागू केला जाणार आहे.