पगार कमी असल्याचे सांगत ऑफिसमध्ये वास्तव्य
कमी पगाराबद्दल विरोध दर्शविण्यासाठी एका व्यक्तीने अनोखा मार्ग अनुसरला आहे. तो स्वतःचे बिऱहाड घेऊन ऑफिसमध्येच राहायला आला. माझा पगार अत्यंत कमी असल्याने भाडय़ाच्या घरात राहू शकत नाही, याचमुळे ऑफिसमध्येच राहू लागल्याचे त्याने म्हटले आहे. या कर्मचाऱयाने स्वतःच्या डेस्कखाली स्लीपिंग बॅगमध्ये झोपण्यास सुरुवात केली आहे.
ही घटना अमेरिकेतील असून तेथे टिकटॉकवर सिमोन नावाच्या व्यक्तीने एक व्हिडिओ अपलोड करत याबद्दल सांगितले आहे. व्हिडिओमध्ये सिमोन स्वतःच्या आवश्यक गोष्ठी आणि बिछाना इत्यादी घेऊन ऑफिस क्यूबिकलमध्ये स्थलांतरित होताना दिसून येतो.
माझ्या घरातून स्वतःची सर्व सामग्री सोबत घेत येथे राहण्यासाठी आलो आहे, ऑफिसकडून भाडय़ाच्या घरात राहता येईल इतका पगार मिळत नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. माझे बहुतांश साथीदार घरातूनच काम करत आहेत. ऑफिस रिकामी असल्याने येथे राहण्यासाठी पुरेशी जागा मिळाल्याचे सिमोनने म्हटले आहे. सिमोनने ऑफिसमधील स्वतःच्या केबिनमध्ये कपडे, बॅग, स्लीपिंग बॅग इत्यादी ठेवून त्याला पूर्णपणे घरात रुपांतरित केले आहे. तो आंघोळीसाठी ऑफिसच्या बाथरुमचा वापर करतो आणि ऑफिसच्या फ्रिजमध्ये स्वतःच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी ठेवतो. परंतु 3-4 दिवसांनी ऑफिसकडून सिमोनला हा प्रकार थांबविण्यास सांगण्यात आले आहे. तसेच एचआरने त्याला सोशल मीडियावरून ऑफिसमध्ये राहण्याचे व्हिडिओ हटविण्यास सांगण्यात आले आहे. टिकटॉकवर सिमोनच्या या व्हिडिओला सुमारे 12 दशलक्षवेळा पाहिले गेले आहे.