क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी फातोर्डा येथील स्टेडियमवर खेळविण्यात आलेला ओडिशा एफसी आणि केरळ ब्लास्टर्स संघातील लढत 2-2 अशी बरोबरीत सुटली. मध्यंतराला ओडिशा एफसीचा संघ एक गोलने आघाडीवर होता. ओडिशाचे दोन्ही गोल त्यांचा ब्राझिलीयन स्ट्रायकर डायगो मॉरिसियाने केले तर केरळ ब्लास्टर्ससाठी जॉर्डन मरे आणि गॅरी हूपर यांनी प्रत्येकी एक गोल केला.
या निकालाने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला. केरळ ब्लास्टर्सचे आता 17 सामन्यांतून तीन विजय, सात बरोबरी आणि सात पराभवांनी 16 गुण झाले असून ते नवव्या स्थानावर आहेत. ओडिशा एफसी अजूनही शेवटच्या स्थानावर असून त्यांचे 16 सामन्यांतून एक विजय, सहा बरोबरी आणि नऊ पराभवाने 9 गुण झाले आहेत.
केरळ ब्लास्टर्सने सामन्याची सुरुवात चांगली करताना मैदानाच्या दोन्ही बगलेतून आक्रमणे रचून ओडिशा एफसीवर दबाव ठेवला. सामन्याच्या नवव्याच मिनिटाला त्यांच्या जॉर्डन मरे याचा फटका क्रॉसबारवरून गेला. त्यानंतर 20 व्या मिनिटाला ओडिशा एफसीच्या राकेश प्रधानचा फ्रिकीकवरील फटकाही दिशाहीन ठरला.
ओडिशाचा खेळ त्यानंतर बहरला. त्यांचा ब्राझिलीयन आघाडीपटू डायगो मॉरिसियोने कित्येक वेळा ब्लास्टर्सच्या बचावफळीत धडक मारली. एकदा डायगो मॉरिसियोला गोल करण्याची सोपी संधी मिळाली होती, मात्र तो ऐनवेळी चेंडूवर नियंत्रण ठेवण्यात तो अपयशी ठरला. 27 व्या मिनिटाला केरळच्या विसेंत गोमिजच्या पासवर योंडेमबॅम देनेचंद्राचा फटका ओडिशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंगने अडविला.
त्यानंतर केरळ ब्लास्टर्सच्या गॅरी हूपरने सहाल अब्दुल समदच्या पासवर गोल करण्याची संधी वाया घालविली तर लगेच अर्शदीपने केलेल्या चुकीचा फायदा जुआंडेला घेता आला नाही. ओडिशाने मध्यंतराच्या ठोक्याला गोल करून आघाडी घेतली. जॅरी मावीहमिंगथांगाने दिलेल्या पासवर डायगो मॉरिसियोने ब्लास्टर्सचा गोलरक्षक आल्बिनो गोम्सला चकविले आणि चेंडू जाळीत टोलविला.
दुसऱया सत्रातील खेळावर दोन्ही संघांचे समान वर्चस्व आढळून आले. पहिल्या दहा मिनिटांतच केरळ ब्लास्टर्सच्या सहाल अब्दुल समद आणि के. पी. राहुलचे गोल करण्याचे यत्न थोडक्यात हुकले. सामन्याच्या 51 व्या मिनिटाला अखेर केरळ ब्लास्टर्सच्या प्रयत्नांना यश आले. यावेळी गॅरी हूपरने प्रतिस्पर्धी ओडिशा एफसीच्या बचावफळीला भेदून दिलेल्या पासवर जॉर्डन मरेने गोलरक्षक अर्शदीप सिंगला भेदले आणि बरोबरीचा गोल नोंदविला.
बरोबरी झाल्यानंतर केरळ ब्लास्टर्सचा खेळ बहरला. या दरम्यान केरळच्या के. पी. राहुलचे दोन वेळा गोल करण्याचे प्रयत्न दिशाहीन ठरले. 68 व्या मिनिटाला केरळ ब्लास्टर्सने आघाडीचा गोल केला. सहाल अब्दुल समदने दिलेल्या चतुरस्त्र पासवर गॅरी हूपरने अर्शदीपला वेगळय़ा कोंडीत पकडले आणि गोल केला. या गोलनंतर दोनच मिनिटांनी गॅरी हूपरची सहालच्या पासवर तिसरा गोल करण्याची संधी वाया गेली. 74 व्या मिनिटाला कालच्या सामन्यात सामनावीर ठरलेल्या डायगो मॉरिसियोने गोल करून सामना 2-2 असा बरोबरीत आणला. सामना संपण्यास एक मिनिट शिल्लक असताना केरळ ब्लास्टर्सचा गोलरक्षक आल्बिनो गोम्सने ब्रॅड्डन इन्मेनचा गोल करण्याचा यत्न उत्कृष्ट गोलरक्षण करून उधळून लावला.