नवी दिल्ली
यंदाच्या ऑक्टोबरमध्ये भारताचे औद्योगिक उत्पादन गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत समाधानकारकरित्या वाढले आहे. ही वाढ 3.6 टक्के आहे. असा निष्कर्ष आयआयपी आकडेवारीतून काढण्यात आला आहे. देशाच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकांतील ही वाढ गेल्या चार महिन्यांमधील सर्वाधिक आहे असेही दिसून आल्याने अर्थव्यवस्थेची गती वाढल्याचे स्पष्ट होत आहे.
ऑक्टोबर 2019 मध्ये भारताचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक 6.6 टक्क्यांनी घसरला होता. आता तो 3.6 टक्क्यांनी वाढला असून सध्या 128.5 इतका आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑक्टोबर या काळात औद्योगिक विकास दर 17.5 टक्क्यांनी आकुंचित झाला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनची केला गेल्याने बहुतेक उद्योग बंद होते. परिणामी उत्पादनही थंडावले होते. आता त्यात हळूहळू सुधारणा होत आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या निर्देशांकातही 3.5 टक्क्यांची वाढ झाली असून तो 130.7 या पातळीवर पोहचला आहे. या सर्व घटना अर्थव्यवस्थेतील सुधारणा दर्शवितात, असे मत तज्ञांनीं व्यक्त केले.