वार्ताहर / कंग्राळी खुर्द
लाल मातीतील कुस्ती परंपरा जिवंत ठेवण्यासाठी आणि नवीन होतकरू पैलवानांना प्रोत्साहन देण्यासाठी कंग्राळी खुर्द येथील बाल हनुमान कुस्तीगीर संघटनेतर्फे रविवार दि. 7 मार्च रोजी भव्य कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले आहे. यासंदर्भात नुकतीच कुस्तीगीर संघटनची बैठक अनंत निलजकर यांच्या कार्यालयात झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ऑलिम्पिकपटू एम. आर. पाटील होते.
यावेळी कुस्ती मैदान भरविण्यासंदर्भात चर्चा झाली. कर्नाटक आणि महाराष्ट्रासह बेळगाव तालुक्मयातील नामवंत पैलवानांच्या कुस्त्या ठरविण्यासंदर्भात चर्चा होऊन कुस्ती मैदान भरवून यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी केला. कुस्ती प्रशिक्षक पै. काशीराम पाटील, कार्याध्यक्ष अनंत निलजकर, अध्यक्ष एम. आर. पाटील, उपाध्यक्ष माजी कुस्ती प्रशिक्षक किसन पाटील, सचिव दिनेश मुतगेकर, खजिनदार गजानन पाटीलसह नाना पाटील, पै. प्रशांत पाटील, संभाजी पाटील, आप्पाजी पाटील, पी. वाय. पाटील, रमेश धामणेकर, वाय. आर. पाटील यांच्यासह पैलवान मंडळी, कुस्तीप्रेमी नागरिक उपस्थित होते.