प्रतिनिधी/ सातारा
माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे कट्टर समर्थक व आमदार मकरंद पाटील यांचे निष्ठावान कार्यकर्ते शिरवळचे उदय कबुले यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाची तर खटावचे प्रदीप विधाते यांना उपाध्यक्षपदाची लॉटरी लागली. जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच अपक्ष निवडून आलेले उदय कबुले यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. सकाळी 10.30 वाजेपर्यंत संजीवराजेंच्या नावाची चर्चा सुरु असताना अचानक सुरु असलेल्या बैठकीत थोरल्या साहेबांकडूनच रामराजेंच्या मोबाईलवर संदेश येताच उदय कबुले यांचे नाव जाहीर करुन त्यांचा एकमेव अर्ज अध्यक्षपदासाठी दाखल करण्यात आला. पीठासन अधिकारी असलेल्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनीही बिनविरोध निवडी जाहीर केल्या. संजीवराजे, वसंतराव मानकुमरे यांच्यासह सदस्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
सातारा जिह्यात विधानसभा निवडणुकीपासून मंत्रीपदाच्या वाटपापर्यंत जे राजकारण झाले. त्याचे पडसाद थेट जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये उमटले. अगदी अर्ज भरण्याच्या पूर्वी सकाळी साडे दहा वाजेपर्यंत संजीवराजे हेच अध्यक्ष तर मानसिंगराव जगदाळे हे उपाध्यक्ष होतील अशी चर्चा जोरात सुरु होती. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्ष बंगला येथे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी आमदार प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक सुरु होती. त्याच दरम्यान रामराजेंना थेट एक संदेश येतो अशी चर्चा असून त्या संदेशाद्वारे रामराजेंनीच अध्यक्षपदासाठी उदय कबुले यांचे अध्यक्षपदासाठी तर उपाध्यक्षपदासाठी प्रदीप विधाते यांची नावे जाहीर करत पक्षश्रेष्ठी शरद पवारसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या आदेशानुसार प्रादेशिक समतोल राखत आपल्याला राष्ट्रवादीचे प्रत्येक सदस्यांना काम करायचे आहे. ज्यांना संधी मिळाली नाही त्यांनी नाराज न होता नव्या जोमाने नव्या दिलाने कामाला लागा. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना योग्य वेळी योग्य संधी मिळते असे त्यांनी सांगून नाराज झालेल्यांची समजूत घातली. तेथून उदय कबुले आणि विधाते यांचा अर्ज पीठासन अधिकारी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे दाखल करण्यात आला.
दुपारी सव्वा दोन वाजता निवडीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. उदय कबुले यांना सूचक संजीवराजे नाईक-निंबाळकर हे तर प्रदीप विधाते यांना सूचक धैर्यशील अनपट हे होते. जिल्हाधिकाऱयांनी अडीच वाजता निवड झाल्याचे घोषित करुन संजीवराजेंनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात खुप मोठे काम केले आहे. सगळय़ा जिह्याला सांभाळून चालवले आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. पुढे सुध्दा मार्गदर्शन राहिल. याच रितीने इतिहास रचला जाईल असे कौतुक केले.
मनोगतांसाठी चढाओढ, नाराज झालेल्यांनी चकार शब्द उच्चारला नाही
जिल्हा परिषदेच्या या निवडीमध्ये जे इच्छूक होते त्यांची नावे अचानकपणे बाजूला झाल्याने नाराज झालेले मानसिंगराव जगदाळे, सुरेंद्र गुदगे यांनी चकार शब्द सुद्धा बोलले नाहीत. मात्र, वसंतराव यांनी फडणवीस यांच्याप्रमाणे आम्हालाही वाटत होते. पुन्हा येईन असे. विशेष म्हणजे संजीवराजे यांची अपेक्षा होती. मकरंद आबा सरस ठरले. गेल्या वेळेला भरगुडे-पाटलांचा ज्या पट्टय़ाने पराभव केला त्या निष्ठावान कार्यकर्त्याला संधी दिली गेली. शशिकांत शिंदे यांनीही पवारसाहेबांना पटवून विधातेंची वर्णी लावली. बाबांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेत टाचणी पडली तरीही त्याचा आवाज होत नव्हता. असं त्यांच्यासारखं नेतृत्व होते. रामराजे त्यांच्यासोबत असल्याने त्यांना भविष्य आहे. आज कबुले आणि विधाते तुम्ही वर असला तरीही वाकडंतिकड वागला तरीही खालून आम्ही चाफ लावायला आहोत असे ठणकवाले. तसेच संजीवराजे, बापूराव जाधव, भिमराव पाटील, विजय पवार, भिमराव पाटील, अरुण गोरे, प्रतिक कदम, शिवाजीराव चव्हाण, निवास थोरात, अर्चना देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पंचायत समिती सभापतींचा सत्कार, विषय समित्यांच्या निवडी दहा दिवसांनी
नुकत्याच पंचायत समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडींचा कार्यक्रम पार पडला. त्यांचाही यथोचित सत्कार नवीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले आणि उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्या हस्ते करण्यात आला. मात्र, विषय समित्यांच्या सभापतींपदाच्या निवडी या दहा दिवसांमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मकरंद पाटील हे माझे दैवत
मी लक्ष्मणराव तात्यांचा कार्यकर्ता आहे. मकरंदआबांचा सहकारी कार्यकर्ता आहे. आंबाच्या पावलावर पाऊल ठेवून कार्य करणारा कार्यकर्ता आहे. सर्वांना बरोबर घेवून काम करणार आहे. शिरवळ ग्रामपंचायतीत 2012 ते 2017 या दरम्यान उपसरपंच असताना तात्यांचे आणि आंबाचे निष्टेने काम केले. 2017 मध्ये जिल्हा परिषदेच्या सभागृहात आलो. आज तात्या हयात नाहीत याचे दुख होते. तात्यांच्या माघारी आमचे दैवत मकरंद आबा यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वाटचाल सुरु आहे. सर्वांना सोबत घेवून काम करेन.
उदय कबुले, जिल्हा परिषद अध्यक्ष
माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली
माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांला पवारसाहेब, अजितदादा, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व जिह्यातील सर्व राष्ट्रवादीच्या आमदारांनी विश्वास ठेवून संधी दिली. प्रथम मी आभार मानतो. 64 सदस्यांनी मला बिनविरोध केलं. स्व. यशंवतराव चव्हाण यांची ही जिल्हा परिषद असून या जिल्हा परिषदेला कुठेही गालबोट लागणार नाही याची मी काळजी घेईन. संजीवराजे आणि वसंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद विकासाभिमुख करु.
प्रदीप विधाते, उपाध्यक्ष जिल्हा परिषद