क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आयएसएल लीग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर खेळविण्यात आलेली केरळ ब्लास्टर्स आणि जमशेदपूर एफसी यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत संपली.
या निकालाने उभय संघांना प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला. जमशेदपूर एफसीचे आता 14 सामन्यांतून तीन विजय, सहा बरोबरी आणि पाच पराभवाने 15 गुण झाले. केरळ ब्लास्टर्सचे सुद्धा 14 सामन्यांतून तेवढेच गुण झाले, मात्र चांगल्या गोलसरासरीमुळे जमशेदपूरला सातवे तर केरळ ब्लास्टर्सला आठवे स्थान मिळाले.
केरळ ब्लास्टर्सचा कालचा दिवस नव्हता. त्यांना सामन्यावर वर्चस्व ठेऊनही जमशेदपूर एफसीवर विजय मिळविता आला नाही. त्यांच्या गॅरी हूपर, जॉर्डन मरे आणि पुतिया यांचे फटके गोलबारला आदळून परत आले. पहिल्या सत्रातच चार मिनिटांच्या कालावधीत तीन वेळा केरळ ब्लास्टर्सचे गोल करण्याचे यत्न गोलबारला आदळल्याने वाया गेले.
सामन्याच्या सातव्याच मिनिटाला जमशेदपूर एफसीच्या नेरीजूस वॅल्सकीसने हाणलेला फटका केरळ ब्लास्टर्सचा गोलरक्षक आल्बिनो गोम्सने आपल्या उजव्या बाजूने झेपावत कॉर्नरसाठी बाहेर टाकला. केरळने आपली पहिली धोकादायक चाल सामन्याच्या 26 व्या मिनिटाला केली. यावेळी जॉर्डन मरेचा गोल करण्याचा यत्न जमशेदपूर एफसीचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेशने डाईव्ह मारून अडविला.
पहिल्या सत्रात दोन वेळा वाल्सकीस गोल करण्यात अपयशी ठरला. एकदा आयतोरच्या पासवर वाल्सकीसचटा कमजोर फटका दिशाहीन ठरला. पहिलं सत्र संपण्यास पाच मिनिटे शिल्लक असताना केरळ ब्लास्टर्सने आक्रमक खेळ केला आणि जमशेदपूर एफसीवर चांगलाच दबाव आणला. यावेळीच जॉर्डन मरे, गॅरी हूपर अणि पुतिया यांचे फटके गोलबारला आदळले.
दुसऱया सत्रात दोन्ही संघांचे समान वर्चस्व लढतीवर आढळून आले. केरळच्या बचावफळीने जमशेदपूर एफसीचा स्ट्रायकर वॅल्सकीसला मुक्तपणे खेळ करण्याची संधीच दिली नाही. दुसऱया सत्रात केरळ ब्लास्टर्सच्या जॉर्डन मरे याचा गोल करण्याचा यत्न गाशलच्या आडव्या पट्टीवरून गेल्याने वाया गेला. या सामन्यात मध्यफळीत सुरेख खेळ करणाऱया केरळ ब्लास्टर्सच्या सहाल अहमदला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्याला रोख 50,000 रुपये पुरस्कार देण्यात आला.