प्रतिनिधी/ रत्नागिरी
ऑनलाईन कर्जप्रकरणात फसलेल्या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरातील गोडबोले स्टॉपनजीक घडली. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. कैसर उस्मान गुहागरकर (वय 29, ऱा आदिनाथ पॅराडाईज गोडेबोल स्टॉप, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आह़े
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैसर गुहागरकर याची ऑनलाईन कर्ज घेऊन फसगत झाली होती. या कारणातून त्याने शनिवारी घरात कोणी नसताना गळफास घेत आत्महत्या केल़ी या घटनेची खबर त्याचा मामे भाऊ एजाज दाऊद हुनेरकर (वय 47. ऱा आदिनाथ पॅराडाईज गोडेबोल स्टॉप, रत्नागिरी) याने शहर पोलीस स्थानकामध्ये दिल़ी शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास कैसर गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये एजाजला निदर्शनास आल़ा या प्रकरणी शहर पोलिसांना माहिती देताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी तो जिल्हा शासकीस रुग्णालयात पाठवला. या आत्महत्येप्रकरणी तपास शहर पोलीस करत आहेत़
ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगा!
अलिकडे शहरात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहेत. यामध्ये अनेकांची अगदी सहजपणे फसगत होत आहे. या बाबत पोलिसांकडून वारंवार सावधगिरीचे आवाहन करण्यात येते. तरीही आजही अशा फसवणुकीच्या घटना घडतच आहेत. तरी या ऑनलाईनच्या जमान्यात सर्वांनी सावधगिरी बाळगूनच आपले आर्थिक व्यवहार पार पाडावेत. तसेच फसवणुकीच्या प्रकारांना बळी न पडण्याचे आवाहन पुन्हा एकदा पोलिसांनी केले आहे.