चिपळूण नगर परिषद विषय समिती निवडणूक आज
प्रतिनिधी/ चिपळूण
चिपळूण नगर परिषदेच्या विषय समित्यांची निवडणूक 28 डिसेंबर रोजी होत आहे. मात्र महाविकास आघाडीत सभापतिपदांवरून अद्याप एकमत झालेले नाही. ज्याला उपनगराध्यक्षपद मिळेल त्याला सभापतिपदे कमी असा फॉर्म्युला आणण्यात आला आहे. मात्र तो मान्य झालेला नाही. गतवर्षी काँगेसला नशीबाने साथ दिल्याने 3 सभापती करण्याचा मान मिळाला होता. मात्र यावेळी काय होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सध्या उपनगराध्यक्षपद रिक्त असल्याने एका समितीचे सभापतिपदही रिक्तच राहणार आहे.
चिपळूण नगरपरिषदेत निवडून आलेले व स्वीकृत मिळून नगराध्यक्षांसह 30 नगरसेवक आहेत. यात शिवसेना- 12, भाजप- 6, काँग्रेस 6, राष्ट्रवादी- 4 व अपक्ष- 2 असे संख्याबळ आहे. मात्र स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा हक्क मिळत नाही. सध्या सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांची महाविकास आघाडी असून त्यांना दोन्ही अपक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे गतवर्षी सर्व समित्या आपल्याकडे खेचून आणण्यात त्यांना यश आले. यावर्षी चित्र थोडे वेगळे आहे. उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांच्यावर आघाडीने अविश्वासाचा ठराव आणल्याने हे पदही रिक्त झाले असून त्यावर विराजमान होण्यासाठी अनेकजण इच्छुक झाले आहेत.
हे पद कोणाला द्यायचे, याची मोर्चेबांधणी सुरू असतानाच विषय समित्यांची निवडणूकही आली आहे. त्यामुळे ज्याला उपनगराध्यक्षपद त्याला सभापतीपदे कमी असा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. मात्र त्यावर एकमत झालेले नाही. त्यातच गतनिवडणुकीत काँग्रेस, सेनेला प्रत्येकी दोन, राष्ट्रवादीला एक समिती सभापतिपद देण्याचे ठरले होते. मात्र निवडणूक प्रक्रियेत आरोग्य सभापतिपदाच्या सेनेच्या उमेदवार सुषमा कासेकर या त्या समितीच्या सदस्यच नसल्याने त्यांची संधी हुकून हे पद काँगेसच्या संजीवनी शिगवण यांना मिळाले होते. त्यामुळे काँग्रेसने 3 सभापतिपदे भोगली आहेत. खरे तर ही कसूर स्थायी समितीत भरून काढण्यात आली. मात्र तरीही सेनेतील काहीजण आजही नाराज असून संख्याबळाचा विचार करता अधिकपदे मिळावीत, अशी अपेक्षा करीत आहेत तर प्रमुख पदाधिकारी आघाडीत बिघाडी नको म्हणून समतोल राखण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आशा होतील पल्लवीत
शिक्षण, नियोजन, बांधकाम, पाणी पुरवठा, आरोग्य, महिला बालविकास समित्यांसाठी ही निवडणूक होत आहे. गतवर्षीपासून आघाडीने भाजपला एकाकी पाडले आहे. त्यामुळे स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती पद वगळता त्यांना एकही समिती मिळणार नाही तर दुसरीकडे उपनगराध्यक्षपदही रिक्त असल्याने एका समितीचे सभापतिपदही रिक्तच राहणार आहे. त्यामुळे कोणत्या समितीचे पद रिक्त ठेवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र ज्या समितीचे सभापतिपद रिक्त राहील, त्याच समितीतील सदस्यांपैकी कोणातरी एकाला उपनगराध्यक्ष व सभापती ही दोन्ही पदे मिळणार आहेत. त्यामुळे ज्यांची सदस्य म्हणून समितीत वर्णी लागेल, त्यांच्या या दोन्ही पदांसाठी आशा पल्लवीत होणार आहेत.