‘उमा’चे चित्रिकरण
बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवालने स्वतःचा आगामी चित्रपट ‘उमा’चे चित्रिकरण संपविले आहे. या चित्रिकरणाकरता काजल मागील अनेक दिवसांपासून कोलकाता शहरात होती. या चित्रपटात ती नायिकेच्या भूमिकेत आहे. काजलने यापूर्वी पती गौतम किचलूची आठवण येत असल्याचे दर्शविणारी पोस्ट सोशल मीडियावरून शेअर केली होती. सलग 6 आठवडय़ांपर्यंत 16 तास काम केल्यावर गौतम किचलूसोबत ब्रेक घेण्यासाठी आणखीन प्रतीक्षा करू शकत नसल्याचे तिने म्हटले होते.
उमा या चित्रपटाचे दिग्दर्शन तथागत सिंह करत आहेत. ‘उमा’ची निर्मिती अभिषेक घोष तसेच मंत्रराज पालिवाल यांनी केली आहे. काही व्यक्तिरेखा नेहमी तुमच्यासोबत राहतात आणि ‘उमा’ नेहमीच माझ्या आठवणींमध्ये माझ्यासोबत राहणार असल्याचे काजलने महटले आहे.
या चित्रपटात टीनू आनंद, हर्ष छाया, मेघना मलिक, श्रीस्वरा आणि गौरव शर्मा हे महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसून येणार आहेत. चित्रपट एका एकत्र कुटुंबात होणाऱया विवाहाच्या पार्श्वभूमीवर बेतलेला आहे. या कुटुंबात एक अनोळखी उमा आल्यावर गोष्टी बदलत जातात असे चित्रपटात दर्शविण्यात आले आहे.
काजल ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेत्री आहे. बॉलिवूडमध्ये तिचा फारसा जम बसला नसला तरीही दक्षिणेतील सर्वच चित्रपटसृष्टींमध्ये तिने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. काजल आता वेबसीरिजमधूनही झळकणार असल्याने तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.