मासे – भाजीविक्रीसह जवळजवळ सर्व आस्थापनांचे व्यवहार राहिले बंद, मोटारसायकल पायलट, रिक्षाचालकांनीही व्यवसाय बंद ठेवून दिला प्रतिसाद
प्रतिनिधी / काणकोण
वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण लक्षात घेऊन आणि कोविड-19 च्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काणकोण तालुक्यात घोषित करण्यात आलेला चार दिवसांचा स्वेच्छा लॉकडाऊन यशस्वीरीत्या पार पडला. व्यापाऱयांनी गुरुवारपासून रविवारपर्यंत आपली सर्व आस्थापने बंद ठेवून जागरूक नागरिकांनी केलेल्या स्वेच्छा लॉकडाऊनच्या आवाहनाला बऱयापैकी प्रतिसाद दिला. मात्र तालुक्यातील बाजाराचे प्रमुख ठिकाण असलेले बागायतदार भवन पोलीस बंदोबस्तात खुले ठेवण्यात आले.
माशे येथील काही दुकाने वगळता शुक्रवारपासून रविवारपर्यंत पैंगीण, श्रीस्थळ, चावडी, चार रस्ता, पाळोळे परिसरांतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. याआधी सरकारने लॉकडाऊन केला होता. त्यामुळे कोणत्याच ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र पोलीस कुमक ठेवली जायची. मात्र यावेळचा लॉकडाऊन तालुक्यातील व्यापारी व अन्य नागरिकांनी स्वखुशीने केलेला असल्याने पहिल्यांदाच बागायतदार भवनचा अपवाद वगळता पोलीस कर्मचाऱयांना आराम मिळाला, अशी चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे.
काही व्यापाऱयांनी पावसाळी साहित्य आणले होते. नुकतीच कोठे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स खुली झाली होती. काही विक्रेत्यांनी आपल्या दुकानात आईस्क्रीम भरून ठेवले होते. या सर्वांबरोबरच दिवसभरात मजुरी करून उपजीविका चालविणारे कामगार, मासळी-भाजी विकून चरितार्थ चालविणारे विक्रेते, मोटारसायकल पायलट, रिक्षाचालक या सर्वांनी आवाहनाला प्रतिसाद देऊन सर्व व्यवहार बंद ठेवले. बागायतदार भवन मात्र गुरुवारपासून शनिवारपर्यंत खुले ठेवण्यात आले असले, तरी सतत पडणारा पाऊस आणि स्वेच्छा लॉकडाऊनच्या प्रभावामुळे ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरविली. या प्रकारावर तालुक्यातील जागरूक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. काणकोणसारख्या भागात या संस्थेला अन्य प्रतिस्पर्धीच नाही. चार दिवस ज्यावेळी काणकोणची बाजारपेठ बंद ठेवली जाते त्यावेळी हात धुवून घ्यावेत असाच विचार या संस्थेने केला असावा, असे मत माजी उपनगराध्यक्ष दिलीप केंकरे यांनी व्यक्त केले.
लोकांची तुरळक उपस्थिती
12 व 13 रोजी राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी पतसंस्था, औषधालये वगळल्यास तालुक्यातील सर्व व्यवहार ठप्प होता. मात्र या ठिकाणी देखील ग्राहकांची तुरळक अशीच उपस्थिती होती. चावडीवरील कदंब बसस्थानकावर शुकशुकाट दिसून आला. या स्थानकावरील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. आरटीओ कार्यालय, मामलेदार, गटविकास अधिकारी कार्यालय, कृषी कार्यालयात नेहमीची गर्दी दिसली नाही. स्वेच्छा लॉकडाऊनचे गांभीर्य ओळखून काणकोणच्या नागरिकांनी घरातून बाहेर पडणे टाळले, असे मत माजी नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर, रणजित देसाई यांनी व्यक्त केले.
मासे, चिकनविक्री बंद
या तालुक्यातील चावडी, पैंगीण, वडामळ, चार रस्ता येथील मासेविक्री तसेच खालवडे, भाटपाल, चावडी, चार रस्ता येथील चिकनविक्रीची दुकाने सतत चार दिवस बंद ठेवण्यात आल्यामुळे मांसाहारी व्यक्तींची खूपच गैरसाय झाली. मात्र या सर्व गोष्टी नागरिकांच्या भल्यासाठी करण्यात आल्या याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी, असे मत दिवाकर भगत यांनी व्यक्त केले.