जमखंडी-मुधोळ राज्यमार्गावरील शिरोळ क्रॉसजवळील घटना
वार्ताहर/ जमखंडी
स्वीफ्ट कार व राज्य परिवहनच्या आराम बसची समोरासमोर धडक झाल्याने कारमधील चौघे जण जागीच ठार झाल्याची दुर्घटना जमखंडी-मुधोळ राज्यमार्गावरील शिरोळ क्रॉसजवळ शुक्रवारी पहाटे घडली.
जमखंडी तालुक्मयातील गोठे गावचे चौघे युवक स्वीफ्ट कार (क्र. केए 29, एम. 9759) ने धारवाडकडे जात असता बेंगळूरहून जमखंडीमार्गे गुलबर्ग्याला जाणारी राज्य परिवहनची आरामबस (क्र. केए 38, एफ 851) यांची जमखंडी-मुधोळ राज्यमार्गावरील शिरोळ क्रॉसजवळ समोरासमोर धडक झाली. यात कारमधील सिद्राम बसाप्पा तेली (वय 36), बाळाप्पा संगाप्पा शेंडगी (वय 34), हणमंत अण्णाप्पा धनगर (वय 21), रियाज मेहबूब जालगेरी (वय 25) सर्वजण रा. गोठे, तालुका जमखंडी हे जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला होता. चौघेजण ठार झाल्याने गोठे गावावर शोककळा पसरली.
अपघातस्थळाला जमखंडीचे डीवायएसपी आर. के. पाटील, मुधोळचे सीपीआय एच. आर. पाटील, क्राईम ब्रँच पीएसआय एस. एस. घाटगे यांनी भेट दिली. तसेच आमदार आनंद न्यामगौड यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले व अंत्यविधीकरिता आर्थिक सहाय्य केले. तसेच संबंधित अधिकाऱयांशी संपर्क साधून मयतांच्या कुटुंबाना योग्य परिहार देण्याची सूचना केली व आमदार निधीतून साहाय्य करण्याची ग्वाही दिली.
घटनेने कार्यक्रम पुढे ढकलला
जमखंडीत रविवार दि. 5 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला काँग्रेस संस्थापन दिनाचा कार्यक्रम या अपघाताने गोठे गावावर दुःख कोसळले असल्याने पुढे ढकलण्यात आला असल्याचे ऍड. रवि यडहळ्ळी यांनी सांगितले.
जंबगीजवळील अपघातात दुचाकीस्वार ठार
मोटारसायकलस्वाराने उसाने भरलेल्या ट्रक्टर ट्रॉलीला धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची दुर्घटना गुरुवारी रात्री जमखंडी तालुक्यातील जंबगी पुलाजवळ घडली. अश्पाक मुनीरअहमद सोनार (वय 22) रा. यक्कुंडी जिल्हा विजापूर असे मयताचे नाव आहे.
जमखंडी तालुक्यातील तुबचीहून जमखंडीकडे येत असता जंबगी पुलाजवळ उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला मोटारसायकलस्वाराने धडक दिली. मयत अश्पाक हा येथील बीएलडीई महाविद्यालयाचा बी. कॉम. अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. जमखंडी ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून पीएसआय अनिलकुमार राठोड अधिक चौकशी करीत आहेत.