शहरी मतदारसंघांमध्ये उमेदवारांनी मागितले कमळ चिन्ह
निवडणुकीच्या 3 महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रिपद गमाविणारे कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासमोर नवी अडचण उभी राहिली आहे. कॅप्टन यांच्या पंजाब लोक काँग्रेस पक्षाच्या 6 उमेदवारांनी हॉकी स्टिक-बॉल या चिन्हावर निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. आपण भाजपच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवू असे त्यांचे म्हणणे आहे. हे शहरी मतदारसंघ असल्याने ही मागणी झाल्याचे मानले जात आहे. या मतदारसंघांमध्ये भाजपचा लक्षणीय प्रभाव आहे.
उमेदवारांची मागणी पाहता कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी भाजपशी बोलणी सुरू केली आहे. तिकिटवाटपात कॅप्टन यांच्या पक्षाला हे मतदारसंघ मिळाले होते. प्रारंभिक माहितीनुसार भटिंडा ग्रामीण, लुधियाना पूर्व, लुधियाना दक्षिण आणि आत्मनगर मतदारसंघातील उमेदवारांनी कमळ चिन्हाची मागणी केली आहे. याचबरोबर अन्य दोन उमेदवार देखील अशाचप्रकारची मागणी करत आहेत. शहरी मतदारसंघांमुळे कमळ चिन्हावर निवडणूक लढवू इच्छित असल्याचे या उमेदवारांचे सांगणे आहे.
कमळ चिन्ह अधिक प्रचलित
कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासोबत मी आहे, परंतु हॉकी स्टिक-बॉल हे चिन्ह अधिक प्रचलित नसल्याने कमळ हे चिन्ह घ्या अशी लोकांची सूचना आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांना विनंती केल्यावर त्यांनी भाजपसोबत चर्चा करून कमळ चिन्ह मिळवून दिले आहे. शहरांमध्ये कमळ हे चिन्ह अधिक पसंत केले जात असल्याचे राज नंबरदार यांनी म्हटले आहे.
काँग्रेस आमदारांचा भाजप प्रवेश
कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या पक्षापासून नेते अंतर राखत असल्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी काँग्रेस सोडणारे आमदार राणा सोढी, फतेहजंग बाजवा आणि हरजोत कमल यांनी कॅप्टन यांच्याऐवजी भाजपची साथ पत्करणे पसंत केले होते.
37 जागांवर निवडणूक लढतोय पक्ष
पंजाबमध्ये पहिल्यांदाच कॅप्टन अमरिंदर सिंह हे भाजपसोबत मिळून निवडणूक लढवत आहेत. या आघाडीत सुखदेव ढींडसा यांचा शिअद संयुक्त हा पक्ष देखील सामील आहे. आघाडीत भाजप 65, कॅप्टन यांचा पक्ष 37 तर शिअद संयुक्त 15 जागांवर निवडणूक लढवत आहे.