राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात शौर्य पुरस्कारांचे वितरण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राष्ट्रपती भवनात सोमवारी पार पडलेल्या भव्य समारंभात पराक्रम गाजवलेल्या सैनिक व अधिकाऱयांना शौर्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडविणारे कॅप्टन वर्थमान अभिनंदन यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वीरचक्र देण्यात आले. अन्य अनेक वीरांनाही शौर्य पुरस्कार या कार्यक्रमात प्रदान करण्यात आले.
वीरचक्र हा शौर्य पुरस्कारांमध्ये तिसऱया क्रमांकाचा सर्वात मानाचा पुरस्कार मानला जातो. अभिनंदन यांना हा पुरस्कार ऑगस्ट 2019 मध्येच घोषित करण्यात आला होता. तथापि, कोरोना परिस्थितीमुळे या पुरस्काराचे वितरण आत्ता करण्यात आले. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंग आणि इतर केंद्रीय मंत्री व विविध क्षेत्रांमधील मान्यवर उपस्थित होते.
अभिनंदन यांचा पराक्रम
फेब्रुवारी 2019 मध्ये पाकिस्तान प्रशिक्षित आणि पुरस्कृत दहशतवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांच्या बसवर स्फोटके भरलेली कार आदळवून 40 सैनिकांच्या हत्या केल्या होत्या. भारताने त्यानंतर 12 दिवसांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर बाँबफेक करुन किमान 50 दहशतवादी आणि त्यांचे प्रशिक्षक यांना कंठस्नान घालत पाकच्या हल्ल्याचा सूड उगविला होता. पकिस्तानने आपले एफ-16 विमान पाठवून भारतात बाँबफेक करण्याचा प्रयत्न केला. कॅप्टन अभिनंदन यांनी आपल्या मिग 21 या विमानातून या एफ-16 विमानाचा पाठलाग करून ते विमान पाडविले होते. तथापि, त्यावेळी त्यांनाही स्वसंरक्षणासाठी आपल्या विमानातून उडी घ्यावी लागली आणि ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरले. पाक सैनिकांनी त्यांना अटक केली. मात्र, भारताने पाकिस्तानवर दबाव आणून त्यांची दोन दिवसांमध्ये सुटका केली. एफ-16 हे आधुनिक विमान पाडविल्याच्या पराक्रम केल्यामुळे कॅप्टन अभिनंदन यांना वीरचक्र पुरस्कार आणि पदोन्नती देण्यात आली.
विभूती शंकर ढौढियालना शौर्य चक्र
याच कार्यक्रमात मेजर विभूती शंकर ढौंढियाल यांना मरणोपरांत शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. त्यांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. मात्र या चकमकीत त्यांनाही गोळी लागून वीरमरण आले होते. या कारवाईत त्यांनी दहशतवाद्यांकडून 200 किलोग्रॅम स्फोटकेही हस्तगत केली होती. त्यांची पत्नी लेफ्टनंट नितीका कौल आणि त्यांच्या मातेने हा पुरस्कार स्वीकारला.
सोमबीर यांना शौर्यचक्र
जम्मू-काश्मीरमधील एका कारवाईत ए प्लस प्लस श्रेणीतील मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला टिपल्याचा पराक्रम केल्यामुळे नायब सुभेदार सोमबीर यांनाही सोमवारी मरणोपरांत शौर्यचक्र प्रदान करण्यात आले.
जाधव यांना कीर्तीचक्र
कोअर ऑफ इंजिनिअर्सचे सपर प्रकाश जाधव यांना जम्मू-काश्मीरातील एका चकमकीत दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यामुळे दुसऱया क्रमांकाचा सर्वाधिक मानाचा मानला जाणारा ‘कीर्तीचक्र’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. जाधव यांच्या पत्नी आणि मातेने हा पुरस्कार स्वीकारला.
झाकीर हुसेन यांना शौर्यचक्र
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला भागात दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात महत्वाची भूमिका बजावलेले सीआरपीएफचे पोलिस कॉन्स्टेबल झाकीर हुसेन यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आले. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते जखमी झाले होते. त्यांनी आपले सहकारी हर्षपाल सिंग यांच्यासह एका दहशतवाद्याला ठार केले होते तर दोघांना जखमी केले होते, अशी माहिती देण्यात आली.