जुलै महिन्याचे अद्याप वेतन नाही,कर्मचारी चिंतेत
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. याला परिवहन मंडळ देखील अपवाद नाही. लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन महामंडळाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी या खात्यात सेवा बजावणाऱयांना वेतनापासून वंचित रहावे लागत आहे. ऑगस्ट महिन्याचा पंधरवडा उलटला तरी अद्याप बेळगाव विभागातील परिवहन मंडळाच्या कर्मचाऱयांचे जुलै महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही.
लॉकडाऊनमुळे परिवहन मंडळाच्या बसेस बराच काळ थांबून होत्या. त्यामुळे आर्थिक उलाढाल ठप्प होऊन परिवहनला कोटय़वधी रुपयांचा फटका बसला. त्यामुळे कर्मचाऱयांचे वेतन देण्यासाठी निधीची कमतरता जाणवत आहे. शिवाय अनलॉकनंतर सुरू झालेल्या बससेवेला म्हणावा तसा प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. परिवहनच्या तिजोरीत ठणठणाट निर्माण झाल्याने खात्यातील कर्मचाऱयांना जुलैच्या वेतनापासून वंचित रहावे लागले आहे. अनलॉकनंतर राज्यांतर्गत व जिल्हय़ांतर्गत बससेवा सुरू झाली असली तरी आंतरराज्य बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली नाही. त्यामुळे परिवहनच्या महसुलात वाढ झाली नाही. दरम्यान परिवहन आर्थिक अडचणीत सापडले आहे. कर्मचाऱयांचे वेतन लांबणीवर पडल्याने केएसआरटीसीचे बसचालक, वाहक व तांत्रिक कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत.
सर्व निगम-महामंडळामध्ये 1 लाख 20 हजार कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱयांमध्ये आता वेतनाची चिंता लागली आहे. मागील वर्षभरात वेतनाला सातत्याने उशीर होत आहे. गतवषी परिवहनला राज्य सरकारने 761 कोटी रुपयांची मदत केली होती. त्यातून कर्मचाऱयांचे वेतन देण्यात आले होते.