चंदा कोचर कुटुंबियांसह विविध कंपन्यांची 78 कोटींची संपत्ती जप्त
मुंबई / वृत्तसंस्था
आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ आणि एमडी चंदा कोचर आणि तिच्या कुटुंबियांविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी मोठी धडक कारवाई केली. ईडीने चंदा कोचरचा मुंबईस्थित बंगला आणि पती दीपक कोचर यांच्या कंपनीची बरीच मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या संपत्तीची एकूण किंमत 78 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. 2012 मध्ये आयसीआयसीआय बँकेकडून व्हिडीओकॉनला मिळालेल्या 3,250 कोटींच्या कर्जप्रकरणी चंदा कोचर यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
चंदा कोचर यांच्या मुंबईतील बंगल्यासह त्यांच्या पतीच्या मालमत्तेवरही ईडीने टाच आणली आहे. त्यामुळे चंदा कोचर यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. एकूण 78 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुखपदाची धुरा सांभाळत असताना मर्जीतील लोकांना आर्थिक फायदा केल्याप्रकरणी सीबीआयने चंदा कोचर, वेणूगोपाल धूत यांच्यासह इतर पाचजणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. चंदा कोचर यांच्या सोबत त्यांचे पती, त्यांच्या सहकारी व्हिडीओकॉन कंपनीचे दोन युनिट आणि कोचर यांच्या न्यू पॉवर रेनेवेबल्स तसेच सुप्रीम एनर्जी या कंपन्यांचाही यामध्ये समावेश आहे.
काय आहे प्रकरण?
2009-10 मध्ये चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख पदावर असताना नियम डावलून तसेच पदाचा गैरवापर करत व्हिडीओकॉन उद्योगसमूहाला कर्ज दिले होते. त्यानंतर धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या व्यवसायात 64 कोटी रुपयांचे भांडवल गुंतवले होते. आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर काही महिन्यातच धूत यांनी कंपनीची मालकी दीपक कोचर यांच्या ट्रस्टकडे हस्तांतरित केली होती. यासंबंधी विविध आरोप-प्रत्यारोप होऊ लागल्यानंतर चंदा कोचर यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये पदाचा राजीनामा दिला होता. अलीकडेच त्यांनी आपल्याविरुद्ध बँकेने केलेल्या कारवाईबाबत मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.