ऑनलाईन टीम / सातारा :
सातारा जिह्यातील कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनेलने बाजी मारली आहे. एकूण 17 जागांपैकी महेश शिंदे यांना 13 जागांवर विजय मिळाला असून, आमदार शशिकांत शिंदे यांना अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकत कोरेगाव नगरपंचायतीवर शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनलची सत्ता आली आहे.
कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत सर्व 17 जागांची मतमोजणी पूर्ण झाली असून, 13 जागा कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेलला आणि 4 जागा राष्ट्रवादी पॅनेलला मिळाल्या आहेत. त्यामुळे आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेलच्या ताब्यात सत्ता आली आहे. राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा बँक निवडणुकीतही आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसला होता. कारण शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला होता. तर ज्ञानदेव रांजणे विजयी झाले होते.