वार्ताहर / दोडामार्ग:
गणेशोत्सव आता काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे तालुक्यातील गणेशमूर्ती शाळांमध्ये लगबग सुरू झाली आहे. साटेली-भेडशी येथील पंढरीनाथ देऊलकर व मुलगा प्रथमेश देऊलकर यांच्या गणेशआर्ट या मूर्ती शाळेतील गणेश मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सुबक व देखणे गणेशमूर्ती साकारण्यासाठी आता चित्र शाळांमध्ये रात्री जागू लागल्या आहेत. तालुक्यातील इतर शाळांमध्येही अशीच स्थिती असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जात आहे.
देशभरात महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची वेगळी ओळख आहे. त्यातही कोकणच्या गणपती उत्सवाचे वेगळं वैशिष्टय़ आहे. मात्र, सध्या कोकणात सर्वत्र कोरोना विषाणूच्या संसर्गाचे सावट आहे. त्यामुळे गणेशोत्सवात साजरा करणाऱया कोकणातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जात आहे. साटेली-भेडशी येथील पंढरीनाथ देऊलकर व मुलगा प्रथमेश देऊलकर यांच्या गणेशआर्ट या मूर्ती शाळेतील गणपती बाप्पा ही आकार घेऊ लागले असून रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे. यामध्ये मूर्तींना वेगवेगळय़ा प्रकारचे रंग देणे, नजर उघडणे, सोने भरणे आदी अनेक कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत.