शांतीनगर, नवेवाडे, ओरुलेतही लागण
प्रतिनिधी / वास्को
मांगोरहिलच्या वस्तीपुरताच मर्यादीत राहिलेला कोरोना आता वास्कोतील इतर भागातही पसरू लागल्याने वास्कोवासियांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. मांगोरहिलच्या वस्तीबाहेरील तिसरा रूग्ण रविवारी शांतीनगर भागात आढळून आला. यापूर्वी नवेवाडे व ओरूले या भागात दोन रूग्ण असल्याचे उघडकीस आले होते.
प्रारंभी वास्कोतील मांगोर हिलच्या झोपडपट्टीतच कोरोनाबाधीत लोक सापडत होते. मात्र गेल्या चार दिवसांत इतर भागातही कोरोनाबाधीत व्यक्ती सापडल्या आहेत. वास्कोतील कोरोनाचा मांगोरहिल हा भाग केंद्र बिंदू आहे. मासळी विक्रेत्या व्यक्तीपासून या संसर्गाला सुरवात झाली. त्याचे पूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात सापडले. त्यानंतर शेजाऱयांनाही लागण झाल्याचे आढळून आले. त्यानंतर नागरिकांच्या करण्यात आलेल्या तपासणीत ही संपूर्ण वस्तीच कोरोनोच्या विळख्यात सापडल्याचे आढळून आले. आतापर्यंत मांगोरहिलच्या या वस्तीत 200 कोरोना रूग्ण आढळून आलेले असून अद्याप तपासणी अहवाल येणे बाकी आहे आणि हजारोंची तपासणी होण्याचेही बाकी आहे.
नवेवाडे, ओरूले पाठोपाठ शांतीनगरातही कोरोना
वास्कोत काम करणाऱया आरोग्य खात्याच्या सात कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झालेली आहे. हे कर्मचारी मडगाव, सांगे, आडपई, वाळपई अशा भागतील असून वास्कोतील नवेवाडे आणि ओरूले अशा भागातील दोघे जण आहेत. मात्र, या कर्मचाऱयांशी किंवा आरोग्य खात्याशी सबंध नसलेला एक रूग्ण काल रविवारी वास्को शांतीनगरातील वस्तीत आढळून आला. त्यामुळे मांगोरहिल वस्तीबाहेरील कोरोना बाधीतांचा आकडा आता तीनवर पोहोचला आहे. त्यामुळे वास्कोवासियांच्या चिंतेत अधिक भर पडलेली आहे.
आमदार, नगराध्यक्ष व शासकीय अधिकाऱयांनी घेतला आढावा
रविवारी सकाळी आमदार कार्लुस आल्मेदा, मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत, नगरसेवक फेड्रीक हेन्नरिक, मामलेदार साईश नाईक, पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक व इतरांसमवेत कंटेनमेंट झोनमध्ये जाऊन तेथील शासकीय सेवा कार्याचा आढावा घेतला. बाहय़ रूग्ण विभागाच्या सेवेबाबतही चर्चा केली. दोन दिवसांपूर्वी या भागात लोकांनी नाराजीच्या भावने जो गोंधळ घातला त्याबाबत अधिकाऱयांशी चर्चा करून पोलीस व इतर अधिकाऱयांनी असे प्रकार पुन्हा घडणार नाही याची दक्षता घ्यावी अशी सूचना आमदार कार्लुस आल्मेदा यांनी केली.
कंटेनमेंट झोनच्या बाहेरही पसरतोय
मांगोरहिलमध्ये पहिल्याच दिवशी कोरोना रूग्ण आढळून आल्याने ही वस्ती कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहे. परंतु या वस्तीतून हा कोरोना कंटेनमेंट झोन जाहीर करण्यापूर्वीच बाहेर पडला होता. त्यामुळे वास्कोसह गोव्यातील मडगाव, आडपई, सांगे व इतर भागातही कोरोना पोहोचला आहे. दिवसेदिवस वास्को बाहेरही रूग्ण आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे आता कोरोना मांगोरहिल वास्कोतील कंटेनमेंट झोन पुरता मर्यादीत राहिलेला नाही, हे स्पष्ट झाले आहे.
त्या मासळी विक्रेत्याबाबत चौकशीची मागणी
गोव्यातील कोरोना प्रसाराचा केंद्र बिंदू आता वास्कोतील मांगोरहिल ठरलेले आहे. मात्र, ज्या मासळी विक्रेत्याच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग वास्कोत आला त्याबद्दलची सुस्पष्ट माहिती उघड झालेली नाही. आंध्र प्रदेशच्या मासळी व्यवसायिकाच्या संपर्कात तो आला होता अशी माहिती त्याने दिलेली असली तरी ती आंध्र प्रदेशची व्यक्ती गोव्यातील या एकाच मासळी विक्रेत्याला भेटली होती का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. हा मासळी विक्रेता लॉकडाऊनच्या काळात आडवाटेने कर्नाटकात जाऊन आला असण्याचीही शक्यता लोकांमध्ये व्यक्त होत आहे. त्याच्या कुटुंबातील सहाजणांना कोरोनाची बाधा झाल्याने पती व पत्नी व्यतिरीक्त या कुटुंबातील अन्य व्यक्तींचाही गोव्याबाहेरील व्यक्तींशी संपर्क आलेला असण्याची शक्यता व्यक्त होऊ लागलेली आहे.