जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी दिली माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
संपूर्ण जगाला हादरविणाऱया कोरोनाचे तीन रुग्ण बेळगावात आढळले आहेत. त्यांच्यावर व संशयितांवर सिव्हिल हॉस्पिटलमधील आयसोलेशन विभागात उपचार करण्यात येत आहेत. कोरोना बाधितांचे व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले असून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी ही माहिती दिली.
शनिवारी 13 मिनिटे 11 सेकंदाचा एक ऑडिओ व्हायरल झाला होता. या ध्वनिफितीत कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या तिघा जणांना संशयितांबरोबर ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. याबरोबरच तपासणी अहवालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
रविवारी तीन व्हिडिओ व्हायरल
ही घटना ताजी असतानाच रविवारी सोशल मीडियावर तीन व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आयसोलेशन विभागात बाधितांशी संवाद साधून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. याबरोबरच या विभागात उपचार घेणारा एक संशयित तरुण नाचतानाचा एक व्हिडिओ आहे. आयसोलेशन विभागात संशयितांवर उपचार करणारे डॉक्टर व परिचारिकांना धमकावण्याबरोबरच काही संशयित त्यांना स्पर्श करण्याची किवा त्यांच्या अंगावर थुंकण्याची धमकी देत आहेत, अशी माहिती मिळाली होती. जिल्हा प्रशासनाने याचीही गांभीर्याने दखल घेतली असून बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांनी संबंधितांना समज दिली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेले ऑडिओ-व्हिडिओ ज्यांनी तयार केले आहेत, त्यांच्यावर एफआयआर दाखल करून कारवाई करण्यासंबंधी आपण पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांच्याशी चर्चा केली असून समाजात खोटी व चुकीची माहिती सोशल मीडियांवर पसरविणाऱयांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस बंदोबस्तात वाढ
दरम्यान, यासंबंधी एपीएमसी पोलीस स्थानकात संबंधितांवर एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. संशयितांना रोज बाहेरून जेवण येते. त्यांना भेटण्यासाठीही आयसोलेशन विभागाबाहेर गर्दी असते. सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला देऊनही गर्दी कमी होत नाही म्हणून रविवारी क्वारंटाईन व आयसोलेशन विभागाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.