कोवाड / वार्ताहर
कोवाड (ता.चंदगड) येथील श्रीराम मंदिराच्या प्रवेश दारातच चक्क भला मोठा नागराज अवतरला. रविवारी रात्री 10 च्या सुमारास अचानक प्रकटलेल्या या नागराज च्या दर्शनाने भल्या भल्यांची भंबेरी उडाली.
साधारण 5 फूट लांब, दिसायला रुबाबदार, भली मोठी फडाई आणी मध्ये मध्ये फुत्कार असे दृश्य रविवारी श्रीराम मंदिराच्या आवारात अनेकांना पाहायला मिळाले. कोरोनामुळे फक्त नियमीत भक्तांच्या उपस्थितीत रात्री 8 च्या सुमारास प्रभू श्रीरामाचे पूजन करून मंदिर सभोवती पालखी फिरवण्यात आली. त्यानंतर तासाभराने अचानक नागराजचे आगमन झाले. शिवाजी महागावकर या भक्तांना मंदिराच्या पायऱ्या चढताना अंधारात सापाची चाहूल लागली. त्यांनी लागलीच मंदिराच्या आवारातच गप्पांच्या फडातील तरुणांना हाक दिली. यातील एका तरुणाने साप पकडण्यात तरबेज असणाऱ्या खंडू पाटील या युवकाला बोलावून घेतले. दरम्यान नागराज जवळच असलेल्या कलमेश्वर मंदिराकडे धाव घेऊन फुलाच्या झाडाच्या बुडक्यात दडून बसला. भले मोठे साप पकडण्यात माहीर असलेल्या खंडू पाटील यांनी अथक प्रयत्न करून अखेर त्या नागराजला पकडण्यात यश आले. नवरात्रीत श्री रामाच्या मंदिर परिसरात आलेल्या या नागराज चे अनेकांनी मनोभावे दर्शन घेऊन त्याला चिंचणे येथील जंगलात रात्रीच सोडून जीवदान ही देण्यात आले.