प्रतिनिधी /खानापूर
खानापूर शहर परिसरातील कार्तिक उत्सवाची दि. 4 रोजी सांगता करण्यात आली. या निमित्त येथील मलप्रभा नदीघाटावर गंगा पूजनाचा सोहळा झाला. पण यावर्षी पावसामुळे सकाळी मलप्रभा नदीवर गंगामातेची मूर्ती ठेवून विधिवत गंगापूजन करण्यात आले. यानंतर गंगामातेची मूर्ती श्रीराम मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात आली.
सायंकाळी गंगामातेची ओटी भरण्याकरिता श्रीराम मंदिरात विशेषतः महिलावर्गाची बरीच गर्दी झाली होती. मलप्रभा नदीघाटावर नदीला ओटी अर्पण करून दिवे सोडल्यानंतर प्रत्येक भाविक श्रीराम मंदिरात गंगामातेच्या दर्शनासाठी येत होते. विशेष म्हणजे गंगामातेची मूर्ती चिखलाची आहे. ती श्रीराम मंदिरात ठेवण्यात येते. हीच मूर्ती कार्तिक अमावास्येला मलप्रभा नदीपात्रात प्रतिष्ठापित करून त्या ठिकाणी गंगामातेचे पूजन करण्यात येते. यानंतर ती श्रीराम मंदिरात सुरक्षित ठेवण्यात येते. गेली दोन वर्षे अतिवृष्टीतून आलेल्या महापुरामुळे श्रीराम मंदिरातही पाणी आले होते. या मूर्तीलाही पाण्याने वेढले होते. पण त्या मूर्तीला कोणताच धक्का बसला नाही, हे विशेष म्हणावे लागेल. रात्री 9.30 वाजता महाआरती झाल्यावर गंगामाता उत्सवाची सांगता करण्यात आली. गंगामातेचा उत्सव यशस्वी करण्यासाठी मलप्रभा नदीघाट कमिटीची अध्यक्ष आर. पी. जोशी, सचिव वसंत देसाई, निळकंठ पुजारी, विठ्ठल हळदणकर, आप्पय्या कोडोळी, श्रीकांत नाटेकर, वासुदेव साखळकर, रेश्मा साखळकर, उमेश चित्रगार, सुभाष देशपांडे, प्रकाश देशपांडे, दिनकर मरगाळे, अमोल तिनेकर, अमोल शहापूरकर व इतरांनी प्रयत्न केले. तसेच याच दिवशी खानापूरच्या सीमेवरील मऱयाम्मा मंदिरातही कार्तिक उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
शहरातील विविध मंदिरांतूनही भक्तिभावाने
या आधी म्हणजे शुक्रवार दि. 3 रोजी खानापूरचे जागृत देवस्थान मानलेल्या चौराशी मंदिरातही कार्तिकोत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या निमित्त सायंकाळी 5 वाजता मंदिरात सत्यनारायण पूजा झाली. यानंतर 7 वाजता मंदिर परिसरात दीपप्रज्वलित करून कार्तिकोत्सव साजरा करण्यात आला. रात्री 8 वाजता महाआरती झाल्यावर सर्वांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्तिकोत्सवानिमित्त चौराशी मंदिराच्या आवारात शिवाजी तरुण भजनी मंडळ खैरवाड गावचा संगीत व भारुड भजनाचा कार्यक्रम झाला. संगीत भारुड भजनातून खैरवाडच्या कलाकारांनी सर्वांना मंत्रमुग्ध करून सोडले. याशिवाय शहरातील ग्रामदेवता रवळनाथ मंदिर, लक्ष्मी मंदिर, चव्हाटा देवस्थान तसेच ब्रम्ह मंदिर, लक्ष्मी गदगा मंदिर, विठ्ठल मंदिर, सार्वजनिक गणेश मंदिरातही कार्तिकोत्सव मोठय़ा भक्तिभावाने साजरा करण्यात आला.