नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असणारे वायएसआर काँगेसचे बंडखोर खासदार के. रघु रामकृष्ण यांना त्वरित सिकंदराबाद येथील सेना रुग्णालयात हलविण्यात यावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे त्यांना दिलासा मिळाला. त्यांच्या विरोधात आंध्र प्रदेश पोलिसांनीच देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात हलविण्याची अनुमती द्यावी अशी याचिका सादर करण्यात आली होती.
आपल्यावरील आरोप खोटे आहेत, असा दावा राजू यांनी केला. पक्ष नेतृत्वाशी आपले मतभेद झाल्याने आपल्याविरोधात सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे. आपले राजकीय भवितव्य उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न असून आपण राज्य सरकारच्या दबावतंत्रासमोर झुकणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.
राजू यांना त्वरित सेना रुग्णालयात हलविण्यात यावे. तसेच त्यांच्या वैद्यकीय चाचणीचे व्हिडीओ चित्रण करण्यात यावे. ते न्यायालयाला सादर करण्यात यावे. वैद्यकीय चाचणी होत असताना तेथे तेलंगणा उच्च न्यायालयाचा अधिकारी उपस्थित असावा. तसेच राजू यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात यावी, अशा अनेक सूचना न्या. विनीत सरण आणि न्या. बी. आर. गवई यांनी केल्या.