प्रतिनिधी / करमाळा
करमाळा तालुक्यात विविध शैक्षणिक उपक्रम राबवून जिल्हा परिषद शाळेला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्नशील असलेले गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन आपल्या शैक्षणिक कामकाजाचा आढावा सादर केला. तसेच करमाळ्यातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुप्रिया सुळे यांना लिहिलेली आकर्षक अशी पत्रे देखील सादर केली.
याप्रसंगी करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी करमाळा पंचायत समिती कार्यक्षेत्रातील २२७ शाळांमध्ये लोकवर्गणीतून ‘सायन्स वॉल’ ही संकल्पना राबवण्यात आली आहे. याबद्दल माहिती घेत अभिनव संकल्पनेचे तसेच गटविकास अधिकारी श्री. राऊत यांचे कामकाज पाहून खा.सुळे यांनी कौतुक केले व करमाळा तालुक्यातील शाळांची पाहणी करण्याची इच्छा व्यक्त केली व उद्या (ता.२३) सायंकाळी ५ वाजता कोंढारचिंचोली शाळेला ते भेट देणार आहेत.
अनेक विद्यार्थ्यांनी खा.सुळे यांना विविध आमंत्रण पत्र लिहिली आहेत. ते सर्व पाहून खा.सुळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच गटविकास अधिकारी यांचेही कामकाजाची पध्दत त्यांना आवडली असल्याची माहिती समोर येत आहे.