श्रीनगर / वृत्तसंस्था :
जम्मू-काश्मीरमध्ये 5 ऑगस्टनंतरच्या स्थितीत वेगाने सुधारणा झाली आहे. 15 देशांच्या मुत्सद्यांचे एक पथक काश्मीर खोऱयातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी 2 दिवसांच्या दौऱयावर तेथे गुरुवारी पोहोचले आहे. दौऱयाच्या पहिल्या दिवशी विदेशी मुत्सद्दय़ांनी नागरिकांच्या संघटना, स्थानिक प्रसारमाध्यमे आणि नेत्यांशी चर्चा केली आहे. या चर्चेत स्थानिक लोकांनी जम्मू-काश्मीरमध्ये रक्तपाताचा पाकिस्तानी दुष्प्रचार ठामपणे फेटाळून लावला आहे. विदेशी मुत्सद्दय़ांशी झालेल्या चर्चेत स्थानिकांनी 5 ऑगस्टनंतर हिंसक घटना रोखण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांचे तोंडभरून कौतुक केले आहे.
विदेशी मुत्सद्दय़ांचा दौरा शुक्रवारीही सुरू राहणार आहे. काही अडचणी असल्या तरीही व्यवस्था कायम राखण्यासाठी हे आवश्यक असल्याचे मत स्थानिकांनी मांडले आहे. जम्मू-काश्मीरचे लोक पाकिस्तानला एक इंच भूमीही देणार नसल्याचे काश्मीर खोऱयातील लोकांनी विदेशी मुत्सद्यांना सांगितले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद फैलावत पाकिस्तानने लोकांचा जीव घेतल्याचा आरोप काश्मीरवासीयांनी केला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये हस्तक्षेप न करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव टाकला जावा असे आवाहन नागरिकांनी विदेशी मुत्सद्दय़ांना केले आहे. पाकिस्तानच्या दुष्प्रचाराच्या उलट खोऱयातील सुरळीत स्थितीचे विदेशी मुत्सद्दी साक्षीदार ठरले आहेत. श्रीनगरमध्ये दुकाने खुली होती आणि रस्त्यांवर वाहनांची ये-जा चालू होती. बाजारपेठही फुलल्याचे चित्र विदेशी मुत्सद्दय़ांनी अनुभवले आहे.
मुत्सद्यांनी स्थिती अनुभवली
15 देशांच्या मुत्सद्दय़ांनी जम्मू-काश्मीरमधील सुरळीत स्थिती पाहिली आहे. स्थानिक प्रशासन स्थिती सुरळीत करण्यासाठी करत असलेले प्रयत्नही विदेशी मुत्सद्दय़ांनी अनुभवल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले आहे.
स्थानिक घटकांशी संवाद
मुत्सद्दय़ांची पहिली बैठक तेथील सुरक्षा कर्मचाऱयांसोबत झाली असून यात सुरक्षेची स्थिती तसेच दहशतवादाच्या धोक्याबद्दल माहिती देण्यात आली आहे. मुत्सद्दय़ांनी त्यानंतर जम्मू-काश्मीरच्या पूर्ण क्षेत्रातून आलेल्या नागरी संघटनांच्या सदस्यांशी चर्चा केली आहे. विदेशी मुत्सद्दय़ांनी स्थानिक प्रसारमाध्यमे आणि नेत्यांचीही भेट घेतल्याचे सांगत रवीश कुमार यांनी शुक्रवारी दौरा पूर्ण झाल्यावर याचा तपशील दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. युरोपीय महासंघाचे मुत्सद्दी भविष्यात काश्मीरचा अशाप्रकारचा दौरा करू शकतात असेही त्यांनी म्हटले आहे.
15 देशांचे मुत्सद्दी
अमेरिका, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, बांगलादेश, मालदीव, मोरक्को, फिजी, नॉर्वे, फिलीपाईन्स, अर्जेंटीना, पेरू, नायजर, नायजेरिया, टोगो, गयाना या देशांचे मुत्सद्दी जम्मू-काश्मीरच्या 2 दिवसीय दौऱयावर आहेत.