विदेशी तुकडीचा प्रथमच समावेश होणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बांगला देशच्या 122 सैनिकांची तुकडी गणतंत्रदिनी होणाऱया सैनिक संचलनात सहभागी होणार आहे. विदेशी सैनिकांची तुकडी या संचलनात समाविष्ट होण्याची ही प्रथमच वेळ असेल. हा सन्मानासाठी बांगला देशने भारताचे आभार मानले आहेत. 1971 मध्ये बांगला देशला पाकिस्तानपासून भारताने स्वातंत्र्य मिळवून दिली. यावर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमच्या सैन्याची तुकडी भारताच्या संचलनात सहभागी होणार आहे, असे वक्तव्य त्या देशाने केले आहे.
बांगला देशच्या तुकडीने रविवारी दिवसभर या संचलनाचा सराव केला. या तुकडीचे नेतृत्व कर्नल मोहताशिम चौधरी करीत आहेत. भारताच्या 72 व्या गणतंत्रदिनी संचलनात सहभागी होण्याची संधी मिळणे ही अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. भारत आमचा मित्रदेश असून हे बांगला देशच्या स्वातंत्र्याचेही 50 वे वर्ष आहे. या संचलनात आमच्या दोन तुकडय़ा समाविष्ट होत आहेत. यापैकी एक सैनिक तुकडी असेल तर दुसरी बँड तुकडी असेल. हे वर्ष वंगबंधू शेख मुजिबुर रहमान यांच्या जन्मशताब्दीचेही वर्ष आहे, अशी प्रतिक्रिया चौधरी यांनी एक वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केली आहे.
काही काळ विलगीकरणात 12 जानेवारीला बांगला देशची तुकडी भारतात आली आहे. सध्या त्यांना काही काळापुरते विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कोरोना स्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला. या तुकडीतील सर्वांच्या कोरोना चाचण्याही करण्यात येणार आहेत. सध्या बांगला देशच्या सर्व सैनिकांचे स्वास्थ्य चांगले असून सर्व सैनिक संचलनात भाग घेतील. ही संधी दिल्यामुळे आम्ही भारताचे कृतज्ञ आहोत, अशा शब्दांमध्ये चौधरी यांनी पत्रकारांसमोर त्यांच्या भावना व्यक्त केल्या.