दुरुस्तीकडे दुर्लक्ष : वाहनधारकांना अपघाताला निमंत्रण
प्रतिनिधी /बेळगाव
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंडळाकडून गुळगुळीत रस्ते निर्माण करून वाहनधारकांची सोय करण्यात येत आहे. मात्र बेळगाव शहरातील सर्व्हीस रस्त्यावर सीडी घालण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे गांधीनगर परिसरातील सर्व्हीस रस्ता वाहनधारकांना अपघाताला निमंत्रण देत आहे. या समस्येचे निवारण करण्याच्या दृष्टीने प्राधिकारण मंडळाचे अधिकारी लक्ष देतील का? अशी विचारणा होत आहे.
वाहनधारकांना प्रवास करताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ नयेत याची दक्षता घेऊन राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र सर्व्हीस रस्त्यावरून प्रवास करणाऱया वाहनधारकांना कोणतीही अडचण भासू नये याची दक्षता घेण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे प्रत्येक सर्व्हीस रस्त्यावर कोणत्या ना कोणत्या अडचणींना वाहनधारकांना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी सर्व्हीस रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहेत. तर गांधीनगर येथील सर्व्हीस रस्त्यावर उघडी गटार आहे. या ठिकाणी शहराचे प्रवेशद्वार असल्याने वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते. तसेच न्यू गांधीनगरकडे जाण्यासाठी पुलाखालून रस्ता आहे. परिणामी हे ठिकाण वाहनांच्या गर्दीचे आहे. तसेच सर्व्हीस रस्त्याशेजारीच बसथांबे असल्याने बस प्रवाशांची गर्दी देखील असते. अशातच या उघडय़ा गटारीचा धोका वाहनधारकांना निर्माण झाला आहे. वाहनांना ये-जा करण्यासाठी या गटारीवर सीडी घालून रस्ता करणे आवश्यक आहे. पण कित्येक वर्षापासून याकडे दुर्लक्ष झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंडळाच्या अखत्यारित येणाऱया या गटारीवर सीडी कोण घालणार, असा मुद्दा निर्माण झाला आहे. सदर गटारीमधून महानगरपालिकेच्या हद्दीतील सांडपाणी वाहते. त्यामुळे देखभाल देखील महापालिकेकडूनच केली जाते. परिणामी या गटारीवर सीडी घालण्याकडे महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग मंडळाने दुर्लक्ष केले आहे. मात्र याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. काहीवेळा वाहनांचे अपघात देखील घडत असतात. त्यामुळे वाहनधारकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि सोयिसाठी या गटारीवर सीडी घालण्यात यावी, अशी मागणी होत आहे.