दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची घोषणा – भाजप अन् काँग्रेस लक्ष्य
वृत्तसंस्था/ ..अहमदाबाद
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी गुजरातचा दौरा केला आहे. अहमदाबाद येथील आम आदमी पक्षाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन केल्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली आहे. भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष गुजरातमध्ये स्वतःची ‘दुकाने’ चालवत आहेत. भाजपला गरज भासल्यास काँग्रेसनेच सामग्री पुरविली आहे. दोन्ही पक्षांदरम्यान 27 वर्षे जुनी मैत्री असून ती अजून निभावली जात असल्याची उपरोधिक टीका केजरीवाल यांनी केली आहे.
काँग्रेस आज भाजपच्या खिश्यात आहे. गुजरातमध्ये शेतकरी आत्महत्या करत असून सरकारी शाळांची स्थिती दयनीय आहे. व्यापारी वर्ग घाबरलेला आहे. गुजरातचे मॉडेल आज खराब स्थितीत असून आम्ही ते सुधारणार असल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे. केजरीवाल यांनी देशाचे स्वातंत्र्य आणि देशउभारणीत गुजरातींच्या योगदानाचे कौतुक केले आहे. पण त्यांनी केवळ सरदार वल्लभभाई पटेल यांच्याच नावाचा उल्लेख केला आहे.
सूरत महापालिका निवडणुकीत 27 जागा जिंकल्यावर आम आदमी पक्षाचा उत्साह वाढला आहे. अलिकडेच सूरत शहरात भाजपचे सुमारे 300 कार्यकर्ते ‘आप’मध्ये सामील झाले आहेत. तर गुजराती पत्रकार ईश्वरदान गढवी यांनी सोमवारी केजरीवालांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. गढवी हे गुजरातच्या ग्रामीण क्षेत्रांमधील लोकप्रिय पत्रकार आहेत.
भाजपने मंगळवारी पक्षाच्या आमदारांची गांधीनगरमध्ये बैठक आयोजित केली आहे. कोरोनामुळे मागील दोन महिन्यांपासून भाजप आमदारांची बैठक होऊ शकली नव्हती. केजरीवाल यांच्या गुजरात दौऱयामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. याचमुळे भाजपने तातडीने बैठक आयोजित केल्याचा दावा आप प्रदेशाध्यक्ष गोपाळ इटालिया यांनी केला आहे.