वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रियल इस्टेट कंपनी गोदरेज प्रॉपर्टीजने बेंगळूरमधील गृहबांधणी प्रकल्प विकसित करण्यासाठी 18 एकर जमीन खरेदी केली आहे. कंपनीने मंगळवारी यासंदर्भात शेअर बाजाराला माहिती दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार व्हाइटफील्ड, बेंगळूरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी थेट व्यवहार केला आहे. कंपनीने जमिनीच्या खरेदी रक्कमेबाबत कोणताही तपशील दिलेला नाही.
सदरची जमीन ही जवळपास 18 एकरची असून या जागेत प्रकल्पामध्ये 2.2 लाख वर्गमीटर विक्री योग्य क्षेत्राचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती गोदरेज प्रॉपर्टीजचे कार्यकारी अध्यक्ष पिरोजेशा गोदरेज यांनी दिली आहे.
बेंगळूर शहर प्रकल्पांतील घरांना नेहमीच मागणी राहिली आहे. आयटी व इतर उद्योगांमुळे या शहरात बांधकाम प्रकल्पांना चांगला प्रतिसाद लाभतो. हीच संधी साधून कंपनीने बेंगळुरात महत्त्वाची जागा खरेदी केली आहे. मुंबई, पुणे, बेंगळूर आणि दिल्ली-एनसीआर येथेही कंपनीचे प्रकल्प कार्यरत आहेत.