प्रतिनिधी / फोंडा
गोमंतक गौड मराठा समाज आणि गोवा सरकारच्या आदिवासी खात्यातर्फे पर्वरी येथे गोमंतक गौड मराठा समाज भवन आणि ट्रायबल भवन उभारण्यात येत आहे. शुक्रवार 13 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात येणार आहे.
गोमंतक गौड मराठा समाज केंद्रीय समिती अध्यक्ष विश्वास गावडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच फोंडा येथे बैठक संपन्न झाली. 13 रोजी होणाऱया प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळय़ाला समाजाचे माजी अध्यक्ष तथा आमदार पांडुरंग मडकईकर, पर्वरीचे आमदार रोहन खंवटे, सांगचे आमदार प्रसाद गावकर, माजी मंत्री तथा अनुसुचित जमात आयोगाचे अध्यक्ष रमेश तवडकर, एसटी महामंडळाचे अध्यक्ष दुर्गादास गावडे, माजी मंत्री व उठा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश शंकर वेळीप, मुख्य सचिव परिमल राय, ट्रायबल सचिव संजर गीहार, ट्रायबल खात्याच्या संचालिका त्रिवेणी वेळीप, जि. प.सदस्य कविता भुपेश नाईक, सरपंच स्वप्नील चोडणकर, आणि गोमंतक गौड मराठा समाजाचे अध्यक्ष विश्वास गावडे उपस्थित असतील.
आदिवासी भवनामुळे पुर्वजांचे स्वप्न साकार होईल
गोमंतक मराठा समाजाची स्थापना 5 ऑगस्ट 1962 रोजी स्थापना झाली होती. या समाजाची भव्य अशी वास्तू असावी असा संकल्प पुर्वजांनी केला होता. त्यानुसार पर्वरी येथे सेरूला कोमुनिदादची जागा 1997 साली या समाजाला दिली होती. अंत्यत गरीबीत आणि हालाकीत जगणाऱया या समाजाला एवढा पैसा मिळेल कुठून हीच एक प्रमुख अडचण होती. हया सगळय़ा गोष्टीवर मात करण्यासाठी गोमंतक गौड मराठा समाजाचे विविध स्तरावर विचार केल्यानंतर गोवा सरकारच्या ट्रायबल खात्यातर्फे एक प्रस्ताव पाठवण्यात आला. पर्वरी येथील जागेवर हा प्रकल्प बांधण्यात सहकार्य करा. यादृष्टीने विचारविनीयम केल्यानंतर सरकारने संपुर्ण पाठबळ देऊन या समाजासाठी एक भव्य भवन बांधण्याचे वचन दिले. ते आज पुर्णत्वास येत असल्याचे गावडे म्हणाले.
आदिवासी भवनासाठी रू. 40 कोटी खर्च अपेक्षित अंदाजे 40 कोटी रूपये खर्चुन सदर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तळमजल्यावर पार्किगची व्यवस्था व काही आस्थापने, पहिल्या मजल्यावर प्रशस्त सभागृह, दुसऱया मजल्यावर मुलींसाठी वसतिगृह, तिसरा मजला मुलांसाठी, चौथ्या मजल्यावर बैठक गृह, जीमखाना, वाचनालय, कॅन्टीनसह अशा सुविधा चार मजली इमारत प्रकल्पात बि विंगमध्ये करण्यात आलेल्या आहेत. तसेच ए विंगमध्ये ट्रायबल खाते, ट्रायबल कमिशन आणि एसटी फायनान्स व कोर्पोरेशन याचा समावेश आहे. सदर प्रकल्पाच्या पायाभरणी कार्यक्रमास समाजबांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन विश्वास गावडे यांनी केले आहे.