प्रतिनिधी/ पणजी
गोव्यातील पर्यटनाला चालना देण्याची जबाबदारी राज्याची असली तरी कला चळवळीला चालना देण्यासाठी आणि संस्कृतीला बळ देण्यासाठी सेरेंडिपिटी आर्ट्ससारख्या पायाची गरज आहे. हा महोत्सव कला समुदायाला आम्हाला गरज आहे. मला आशा आहे की हा महोत्सव कला समुदायाला पणजी व गोवा या प्रदेशाचे सांस्कृतिक केंद्र बनवण्यासाठी प्रेरणा देईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजीत आयोजित केलेल्या पाचव्या सेरेंडिपिटी कला महोत्सवाच्या उद्घाटन सोहळय़ाप्रसंगी बोलताना केले.
यावेळी व्यासपीठावर सेरेंडिपिटी कला महोत्सव व फाऊंडेशनच्या संचालिका स्मृती राजगाढिया, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, संस्थापक सुनिलकांत मुंजाल उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
तीन वर्षांच्या कालावधीनंतर गोव्यात पाचवा सेरेंडिपिटी कला महोत्सव आयोजित केला जात आहे. विविध प्रकारच्या कलांचा या महोत्सवात समावेश असून नक्कीच हे प्रयोग रसिकांच्या मनावर छाप सोडतील अशी आशा सुनिलकांत मुंजाल यांनी व्यक्त केली. सेरेंडिपिटी कला महोत्सवात सर्वसमावेशक व प्रायोगिक कार्यक्रमांची पर्वणी आहे. अधिकाधिक मनोरंजक व वेधक असे अनुभवांचा समावेश यात आहे. या महोत्सवातून कला व संस्कृतीचा प्रसार करणे हा मुख्य उद्देश आहे. 14हून जास्त स्थळे आणि 120हून जास्त कार्यक्रमांमध्ये 1000पेक्षा जास्त कलाकारांचा यात समावेश असल्याची माहिती सेरेंडिपिटी कला महोत्सव व फाऊंडेशनच्या संचालिका स्मृती राजगाढिया यांनी यावेळी दिली.
या महोत्सवात प्रदर्शने, चर्चा आणि परिसंवाद, हस्तकला, संगीत, नृत्य आणि नाटय़ यांचे प्रतिनिधित्त्व करणारे कार्यक्रम असतील तसेच भारतीय शास्त्राrय, फ्यूजन, इंडी पॉप, रॉक, इतर शैली प्रतिबिंबित करतील. या महोत्सवाकरिता बिक्रम घोष, एहसान नुरानी, सुदर्शन शेट्टी, वीरांगना सोलंकी, प्रमोद कुमार केजी, अंजना सोमनी, प्रल्हाद सुखटणकर, मयुरी उपाध्याय, गीता चंद्रन आणि क्वासार ठाकोर पदमसी या क्यूरेटरांचा समावेश आहे.