खासदार उदयनराजेंचा दे धक्का, पायी व मोटार रॅलीमुळे सातारकरांच्यात चैतन्य
प्रतिनिधी/ सातारा
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अगोदर खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसादिवशी दि. 24 फेब्रुवारी 2018 ला तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शरद पवारांच्या उपस्थितीत पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरटेरच्या कामाचे भूमिपूजन होवून 2019 मध्ये कामाला प्रारंभ झाला होता. त्याच ग्रेड सेपरेटरच्या कामाची पाहणी करायला म्हणून शुक्रवारी सकाळी खासदार उदयनराजे हे पोवई नाक्यावर कार्यकर्त्यांसह आले अन् अचानक त्यांनी ग्रेड सेपरटेरचे उद्घाटन करुन विरोधकांसह अनेकांना धक्काच दिला. नेहमीप्रमाणे त्यांनी स्टाईलमध्ये कॉलर उडवून स्टाईल ईज स्टाईल असाच इशारा विरोधकांना दिला आहे.
सातारा शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी 2016 पासून पोवई नाक्यावर अगोदर ब्रीज नंतर ग्रेड सेपरटेरच्या कामाची मागणी होत होती. 2017 ला अंतिम कामास मंजुरी मिळाली अन् 2018 च्या 24 फेब्रुवारीला कामाचे भुमिपूजन करण्यात आले होते. 2019 मध्ये कामास प्रारंभ झाला होता. काम पूर्ण होणार कधी याकडे सातारकरांच्या नजरा होत्या. शुक्रवारी मात्र, खासदार उदयनराजे हे नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, श्रीकांत आंबेकर, सुजाता राजेमहाडिक, स्मिता घोडके, सीता हादगे, नगरसेवक श्रीकांत आंबेकर, राजू भोसले, ज्ञानेश्वर फरांदे, मिलिंद काकडे, निशांत पाटील, ऍड. दत्ता बनकर, विजय बडेकर, काका धुमाळ, राजू गोडसे, मनोज सोळंकी यांच्यासह सर्वच सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत पोवई नाक्यावर सकाळी 10 वाजता उद्घाटन करण्यात आले. खासदार उदयनराजे यांनीच फित कापून ग्रेड सेपरटेरच्या कामाचे उद्घाटन केले.
यावेळी कार्यकर्त्यांनी एक नेता एक महाराज…. उदयनमहाराज…. उदयनमहाराज…. अशा घोषणा देत फटाके फोडून जल्लोष केला. ग्रेडसेपरटेरचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर 2019 मध्ये प्रत्यक्ष वेगाने ग्रेड सेपरटेरचे काम सुरु झाले. सुरुवातीला 60 कोटींच्या निधीमध्ये हे काम सुरु होते. त्यात वाढ करुन 15 कोटीमध्ये उरलेले काम सुरु करण्यात आले अन् हे काम पूर्णत्वास गेले आहे. सातारा शहरातील वाहतुकीचा कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रेडसेपरटेर हा महत्वकांक्षी प्रकल्प होता. या कामामध्ये विशेष असे लक्ष खासदार उदयनराजेंनी घातले होते. अगदी डिझाईन करुन घेण्यापासून ते वाढीव निधीच्या कामासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता. आज अचानकपणे उद्घाटन करुन सातारकरांना ग्रेडसेपरेटर खुला करुन देवून आश्चर्याचा धक्का दिला आहे.