पुजनाचे साहित्य खरेदीसाठी शनिवारी ही बाजारपेठेत गर्दी
प्रतिनिधी/ सातारा
आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होताच आता गौराईच्या आगमनाची लगबग सध्या सर्वत्र सुरू आहे. आज रविवार दि. 12 रोजी सर्वत्र गौराईचे आगमन होणार आहे. गौराईसाठी सध्या बाजारपेठ सज्ज झाली आहे. शनिवारी बाजारपेठेत गौरीचे मुखवटे, सजावट साहित्य, दागिन्यांसह कपडय़ांचीही विशेष खरेदी मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. यंदा पारंपरिक नऊवारी साडय़ा महिलावर्गाच्या खास पसंती देण्यात आली होती. त्यामुळे यंदा पारंपरिक नऊवारीत गौराईचे रुप खुलणार आहे. अनेक विक्रेत्यांनी रेडिमेड नऊवार आणि सहावार साडय़ा उपलब्ध करुन दिल्याने या साडय़ांनाही विशेष मागणी आहे.
मागील वर्षी करोनाच्या सावटामुळे जवळपास सर्वच सणांचा उत्साह काहीसा कमी झाला होता. परंतु, यंदा करोनाचे निर्बंध कमी झाल्याने गणेशोत्सवासह गौरी आवाहनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे महिला नऊवारीवर फेटा घालतात, त्याचप्रमाणे गौरीसाठीही खास पैठणीचा फेटा तयार करण्यात आला आहे. हे फेटे गौराईला घालण्यास सोईस्कर व्हावे याकरीता रेडिमेड फेटे ही उपलब्ध आहेत. हे फेटे 250 पासून 500 रूपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
तसेच सध्या गौरायीच्या मुखवटय़ा सोबतच संपूर्ण तयार गौराईच्या मुर्त्या ही बाजार पेठेत विक्रीस दाखल आहेत. यामध्ये साध्या मुर्ती बरोबरच फायबरच्या मुर्त्या ही विक्रीस आहेत. या मुर्त्या 3 हजार रूपयांपासून ते 35 हजार रूपयांपर्यंत विक्रीस आहेत. तसेच दागिण्यांची ही खरेदी मोठया प्रमाणात करण्यात आली आहे. यामध्ये अधिकतर भर ही नथ, तसेच ऑक्सीब्लीचचे दागिण्यांना ही अधिक पसंती देण्यात आली आहे.
खाद्यपदार्थाची मागणी ही वाढली
गौराच्या पुजनासमोर विविध खाद्यापदार्थ ही ठेवण्यात आलेले असतात. सध्या कित्तेक नोकरदार महिलांना हे सर्व पदार्थ घरी बनविण्याकरीता वेळ नसल्याने बहुतांश महिलावर्गांकडुन तयार खाद्यापदार्थ्यांची मांडणी करण्यात येते. त्यामुळे लाडू, चिवडा, विविध प्रकारच्या मिठाई, शंकरपाळी, बालुशाही आदी खाद्यपदार्थ्यांच्या खरेदीची मोठ्ठी उलाढाल झाली होती.