कराड : कराड तालुक्यातील चचेगाव येथील कोळे पानंद रस्त्यावरील देशपांडा शिवारात शॉर्टसर्किटमुळे उसाच्या शेताला भीषण आग लागली. आग लागल्यानंतर शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी तात्काळ आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र उसाच्या पाचटीमुळे आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले. अवघ्या तासाभरातच 12 शेतकऱ्यांचा तेरा एकरातील ऊस जळून खाक झाला.
आगीत चचेगाव येथील विनोद गायकवाड, सुभाष पवार, सहदेव पवार, लालासो पवार, विक्रम पवार, मोहन पवार, दिलीप पवार, अनिल कांबळे, महादेव पवार, साहेबराव पवार, बाजीराव पवार आणि लक्ष्मण पवार या शेतकऱ्यांचा ऊस जळाला असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महावितरणने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे