वृत्तसंस्था/ मियामी
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या मियामी खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत जपानच्या नाओमी ओसाकाने एकेरीची तिसरी फेरी गाठताना जर्मनीच्या अँजेलिक केर्बरचा पराभव केला.
या स्पर्धेतील गुरुवारी झालेल्या दुसऱया फेरीच्या सामन्यात ओसाकाने केर्बरवर 6-2, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये मात केली. या लढतीत ओसाकाने पहिला सेट केवळ 29 मिनिटांत जिंकला. हा सामना 60 मिनिटे चालला होता. दुखापतीमुळे रुमानियाची सिमोना हॅलेप आणि स्पेनची मुगुरुझा यांनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. 2017 नंतर ओसाकाचा केर्बरवरील हा पहिला विजय आहे. दुसऱया एका सामन्यात झेकच्या मुचोव्हाने कॅनडाच्या लैला फर्नांडिसचा 6-4, 7-6 (7-3), त्याचप्रमाणे कॅटरिना सिनियाकोव्हाने इमा रॅडुकानूचा 3-6, 6-4, 7-5 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. हा सामना तीन तास चालला होता.
पुरुषांच्या विभागात ब्रिटनच्या अँडी मरेने विजयी सलामी देताना डेलबोनिसचा 7-6 (7-4), 6-1 असा पराभव केला. पुरुषांच्या विभागात अमेरिकेचा टॉमी फॉल, सेबेस्टियन कोर्दा, ब्रुक्सबाय, जॉर्डन थॉम्पसन आणि जपानचा निशिओका यांनी विजयी सलामी देत दुसऱया फेरीत स्थान मिळविले.
रुमानियाची हॅलेप हिला दुखापत झाल्याने ती आता किमान तीन आठवडे टेनिस क्षेत्रापासून अलिप्त राहील. गेल्या आठवडय़ात हॅलेपने इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. मियामी स्पर्धेत हॅलेपला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. पायाला झालेल्या दुखापतीमुळे हॅलेपने दुसऱया फेरीचा सामना सुरू होण्यापूर्वीच स्पर्धेतून माघार घेतल्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे स्पेनच्या मुगुरुझाच्या मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे तिने या स्पर्धेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.