ऑनलाईन टीम / जम्मू :
भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र रैना यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रैना यांनी स्वतः याबाबत सोशल मीडिया वरून माहिती दिली.
ते म्हणाले, दहशतवाद्यांनी बांदीपोरामध्ये भाजप नेता वसीम बारी, उमर सुल्तान आणि त्यांच्या वडीलांच्या हत्येनंतर मी पाच दिवस काश्मीरमध्ये होतो. त्यानंतर आज मला थोडा ताप आला. त्यामुळे मी कोरोनाची टेस्ट केली त्यावेळी मला कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
काश्मिरच्या काही भागात कोरोना थांबण्याचे नावच घेत नाही आहे. जम्मू काश्मीरचे केपीएस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर श्रीनगर पोलीस मुख्यालय सील करण्यात आले. तर दुसरीकडे मागील चोवीस तासात एका सीआरपीएफ जवानासह 8 जणांचा कोरोनाने जीव घेतला. 55 वर्षीय जवान कुलगाममध्ये तैनात होता. तर 314 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये जम्मूमधील 89 तर काश्मीर मधील 225 जणांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 116 रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. यामध्ये जम्मूतील 53 तर काश्मीरमधील 63 जणांचा समावेश आहे.