प्रतिनिधी/ सातारा
गेली तीन दिवस जिल्हय़ात बाधित वाढ मंदावली असून वाढीचा वेग 150 वर स्थिर आहे. सलग तीन दिवस बाधित वाढ 150 च्या खाली राहिली आहे. बाधित वाढीचा आलेख पुढील दिवसात असाच खाली जात राहिल्यास जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने आगेकूच करेल अशा आशा पल्लवित झाल्या आहेत. हॉटस्पॉट सातारा, फलटण तालुकेही चांगलेच सावरले असून इतर तालुक्यातही नगण्य संख्येने नवीन बाधित समोर येत आहेत. तर सोमवारच्या अहवालात महाबळेश्वर तालुका निरंक राहिल्याचा दिलासा लाभला आहे.
दरम्यान, जिह्यात सोमवारी रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 150 नागरिकांचे बाधित आले तर एका बाधिताचा मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी 241 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिलीय.
वाढ मंदावली पण थांबलेली नाही
शनिवारी 141, रविवारी 147 आणि सोमवारी अहवालात 150 अशी सलग तीन दिवस बाधित वाढ दीडशेच्या खाली राहिली आहे. यामध्ये कराडसह माण, खटाव, खंडाळा, वाई तालुक्यात स्थिती चांगलीच आटोक्यात आली आहे. तर जावली, पाटण, महाबळेश्वर तालुक्यांची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरु झाल्याचे अहवालातील नोंदवरुन समोर येत आहे. मोठया संख्येने होणारी वाढ थांबली असली तर अद्यापही नवीन रुग्ण अल्प संख्येने समोर येत असून ती थांबलेली नाही. अधून, मधून काही तालुक्यात वाढ होत आहे तर पाटण, जावली, महाबळेश्वर शुन्यावर जावून अल्पवाढीवर येत आहेत.
मंगळवारी 12 हजार 41 जणांना लस
मंगळवारी देखील लसीकरणाचा वेग चांगला राहिला असून जिल्हाभरात 12 हज्जर 41 जणांचे लसीकरण करण्यात आले. यामुळे जिल्हय़ात लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या 24 लाख 74 हजार 727 एवढी झाली आहे. तर यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 17 लाख 68 हजार 135 एवढी झाली असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 7 लाख 6 हजार 592 एवढी झाली आहे.
150 जणांचा अहवाल बाधित
सोमवारी रात्रीच्या अहवालानुसार तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे. सातारा 29 (51,027), कोरेगाव 26 (21,739), फलटण 22 (36,800), माण 20 (17,639), खटाव 19 (25,437), कराड 13 (38,815), जावली 6 (9,950), खंडाळा 5 (14,050), वाई 5 (15652), पाटण 1 (10082), महाबळेश्वर 0 (4,665), व इतर 4 (2,092) असे आजअखेर एकूण 2,47,948 जणांचे बाधित आले. तर मृत्यू झालेल्या बाधिताची संख्या (कोरेगाव 1) असून आजअखेर जिह्यात एकूण 6,082 जणांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमूने 20,63,368
एकूण बाधित 2,47,948
एकूण कोरोनामुक्त 2,38,903
मृत्यू 6,082
उपचारार्थ रुग्ण 5,403
मंगळवारी जिल्हय़ात
बाधित 150
मुक्त 241
मृत्यू 01