‘तरुण भारत’इफेक्ट : यंत्रणा खडबडून जागी : पिंगुळी-पाट, कुडाळ-मठ तिठा रस्त्यांसाठी तरतूद
दिवाळीनंतर विमानतळापर्यंतचा मार्ग होणार सुकर
प्रतिनिधी / कुडाळ:
चिपी-परुळे येथील सिंधुदुर्ग विमानतळ व मुंबई-गोवा महामार्ग जोडणाऱया मुख्य पिंगुळी-पाट व कुडाळ-मठ रस्त्यासाठी अखेर साडेसात कोटी रु. निधी मंजूर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 27 सप्टेंबर 2021 च्या पत्राने मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग (कोकण) यांना कळविले आहे. ‘या मुख्य रस्त्यासाठी 57 लाख वगळता निधीच नाही’, असे वृत्त ‘तरुण भारत’ने सोमवारी प्रसिद्ध केल्यानंतर सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. अखेर 27 रोजी सायंकाळी याबाबतचे आदेश काढण्यात आले. त्यामध्ये विमानतळ व महामार्ग जोडणारा पिंगुळी ते पाट तसेच कुडाळ ते मठ तिठा या दोन्ही रस्त्यांसाठी आर्थिक तरतुद करण्यात आली आहे. त्यामुळे विमानतळापर्यंतचा मार्ग दिवाळीनंतर सुकर होणार आहे.
मजबुतीकरणासाठी निधीच नव्हता
गेल्या दोन वर्षांपासून विमानतळ उद्घाटनाचा घाट घातला जात असताना मुख्य रस्ता खड्डय़ात बुडाला. त्याच्या मजबुतीकरणासाठी निधीच नसल्याचे चौकशीत पुढे आल्यानंतर ‘तरुण भारत’ने हा प्रकार उघडकीस आणला. याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच सत्ताधारी तसेच शासकीय अधिकारी खडबडून जागे झाले. विमानतळ उद्घाटनाला अवघे दहा-बारा दिवस राहिले असताना मुख्य रस्त्यासाठी निधीची तरतुदच न झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या विमानतळाच्या उद्घाटनास येणार असल्याने नेते मंडळींनी धावपळ करून हा निधी उपलब्ध करून दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामासाठी अंदाजपत्रकामध्ये निधी मिळावा, यासाठी प्रस्ताव पाठविला. पण अंदाजपत्रकात तरतुद करण्यात आली नाही. पुन्हा 13 सप्टेंबर 2021 रोजी अधीक्षक अभियंता (रत्नागिरी) यांनी पुन्हा प्रस्ताव पाठविला. त्यानुसार 2021-22 मध्ये रस्ते देखभाल-दुरुस्ती अंतर्गत योजनेतर तरतुदीमधून शासनाने विमानतळाला जोडणाऱया दोन रस्त्यांसाठी 7.50 कोटी निधी मंजूर केला आहे.
दिवाळीनंतर कामाला सुरुवात
या निधी मंजुरीसाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रयत्न केले असून खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर यांनी पाठपुरावा केला. विमानतळाला जोडणाऱया पिंगुळी-पाट-कोचरा या राज्यमार्ग 183 वरील पिंगुळी ते पाट (0/00 ते 13/350 किमी.) या रस्त्याची सुधारणा व डांबरीकरणासाठी 4 कोटी 57 लाख, तर मठ-कुडाळ-पणदूर-घोडगे (राज्यमार्ग 179) या मार्गावरील मठ तिठा ते कुडाळ (0/00 ते 11/850) मध्ये सुधारणा व डांबरीकरणासाठी 2 कोटी 92 लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण करून कामांना सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. निविदा प्रक्रिया पूर्ण करणे व इतर कामांना एक-दीड महिना लागणार असून दिवाळीनंतर कामाला सुरुवात होणार आहे.
पिंगुळी-पाट रस्त्यावरील दोन कामांना मंजुरी
पिंगुळी-पाट या रस्त्याच्या 3/500 ते 5 किमी. या दीड किमी. लांबीच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 57 लाख रु., तर करमळगाळू येथील ज्या मोरीवर प्राणघातक खड्डे पडतात. त्या मोरीच्या बांधकामासाठी 21 लाख 40 हजार एवढा निधी मंजूर असून या कामांच्या वर्क ऑर्डर निघाल्या आहेत.