देशविरोधी विचारसरणीला डीकोड करणार- दहशतवादाच्या प्रत्येक पैलूवर होणार संशोधन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजेच जेएनयूत दहशतवादविरोधात ‘सेंटर फॉर नॅशनल सिक्युरिटी’ची स्थापना करण्यात आली आहे. या विभागाला विशेष दर्जा देण्यात आला आहे. हा विभाग स्वतंत्र स्वरुपात काम करणार आहे. या विभागात देशाच्या सुरक्षेसाठी धोका ठरणारे सीमापार दहशतवादासह याच्या सर्व पैलूंवर डॉक्टरेट पातळीवर संशोधन होणार आहे. याकरता तज्ञांची एक फौज तयार केली जात आहे. हे तज्ञ दहशतवाद विरोधात धोरण तयार करण्यासह देशविरोधी कारवाया आणि विचारसरणीलाही डीकोड करतील.
9 फेब्रुवारी 2016 रोजी जेएनयूत डाव्या विचारसरणीशी संबंधित विद्यार्थ्यांनी कथितरित्या देशविरोधी घोषणा दिल्या होत्या. डाव्या विचारसरणीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱया जेएनयूमध्ये तेव्हापासून अनेक बदल झाले आणि त्यांना विरोध देखील झाला. विद्यापीठ परिसरात आता शहीद भगत सिंह मार्ग आणि सावरकर मार्ग तयार झाला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या पुतळय़ाची स्थापना झाली आहे.
मागील 2 वर्षांपासून निष्क्रीय असलेला जेएनयूचा सेंटर फॉर नॅशनल सिक्युरिटी स्टडीज आता सक्रीय भूमिकेत आहे. देशाच्या सुरक्षेच्या मुद्दय़ांवर होणारे संशोधन अत्यंत महत्त्वाचे आहे. याचमुळे येथे डॉक्टरेट पातळीवर संशोधन केले जाईल. देशाच्या सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका दहशतवादाचा आहे. दहशतवादाच्या अनेक रुपांनी आता जन्म घेतला आहे. शस्त्रास्त्रांपेक्षा आता अधिक दुष्प्रचाराचा प्रभाव पाडविण्याचा प्रयत्न होतो. वैचारिक स्तरावर लोकांना दहशतवादाबद्दल आकर्षित करणाऱया कटावरही लक्ष द्यावे लागणार असल्याचे उद्गार संबंधित विभागाचे प्रमुख प्राध्यापक अजय दुबे यांनी काढले आहेत.
कुठल्या मुद्दय़ांवर होणार संशोधन?
सीमापार दहशतवादासह आधुनिक दहशतवादाच्या पद्धती म्हणजेच जैव अस्त्रs, सोशल मीडिया, सायबर क्राइम, अंतर्गत सुरक्षा, देशाविरोधात वातावरण निर्मीत करण्याच्या प्रक्रियेच्या प्रत्येक पैलूवर संशोधन होणार आहे. या विभागात कॉम्प्युटर सायन्स, आयटी आणि अन्य तांत्रिक विभाग यात दहशतवादाचे आधुनिक शस्त्र म्हणजेच तंत्रज्ञानाच्या वापरावरूनही संशोधकांसोबत मिळून काम केले जाणार आहे. मॉलिक्यूलर बायोलॉजी विभाग जैव अस्त्रांच्या संशोधकांसोबत सहकार्य करणार आहे.
अभ्यासक्रमात काय?
अभ्यासक्रमाच्या ‘फंडामेंटलिस्ट रिलीजियस टेररिजम अँड इट्स इम्पॅक्ट’ युनिटमध्ये फंडामेंटलिस्ट रिलीजियस थॉट प्रोसेसला सामील करण्यात आले आहे. स्टेट स्पॉन्सर्ड टेररिजममध्ये प्रामुख्याने पाश्चिमात्य आणि सोव्हियत संघ तसेच चीनदरम्यान झालेल्या आयडियोलॉजिकल वॉरला सामील करण्यात आले आहे.