प्रतिनिधी / वास्को
झुआरीनगर येथील चौपदरी महामार्गावर बुधवारी संध्याकाळी मिलिटरीचा ट्रक व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकी चालक ठार झाला. मयत दुचाकी चालकाचे नाव अनिल रामचंद्र नाईक(39) असे असून हा युवक बोगदा वास्को येथील राहणारा आहे.
या अपघातासंबंधी वेर्णा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार झुआरीनगर सांकवाळ पठारावरील बिटसृ पिलानी जवळच्या महामार्गावर संध्याकाळी साडे चारच्या सुमारास हा अपघात घडला. मिलिटरीचा ट्रक व युवकाच्या माइस्ट्रो या दुचाकीमध्ये धडक बसली. या अपघातात दुचाकी चालक दुचाकीसह ट्रकखाली जाऊन गंभीर जखमी झाला. या जखमी दुचाकी चालकाला त्याच ट्रकच्या चालकाने व इतरांनी ट्रकमध्ये घालून मडगावच्या हॉस्पिसियो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. सदर युवक मृत झाल्याचे उघडकीस येताच, मिलिटरी ट्रकचा चालक व इतर जण हॉस्पिटलमधून ट्रकसह गायब झाले. त्यामुळे हा अपघात नक्की कसा झाला याची माहिती रात्री उशिरापर्यंत उघड झाली नव्हती. मयत युवक बोगदा भागातील राहणारा असून तो एका कंपनीसाठी घरोघरी पार्सल पोहोचवण्याचे काम दुचाकीवरून करीत होता. वेर्णा पोलीस स्थानकातील उपनिरीक्षक रिकांया नाईक या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.