पहिले रेडीओस्टार शाहीर शंकर पाटील यांची कार्यक्रमस्थळी जीवनयात्रा संपली
प्रतिनिधी /चुये
शाहीर गाण्यासाठी मंडप सजला होता …व्यासपीठासमोर रसिकांची गर्दी जमली होती.. काही क्षणातच शाहीर गाण्याला सुरुवात होणार होती.. त्यासाठी वेशभूषा करून व्यासपीठावर जाण्यासाठी शाहिरांची लगबग सुरू झाली व्यासपीठावर चढण्यासाठी काही पावले पडली मात्र इतक्यात नियतीने डाव साधला.. त्या सुप्रसिद्ध शाहिराची शाहिरी नियतीने कायमची संपवली .. आणि जिल्ह्याच्या शाहिरी जगतात शोककळा पसरली ..
दिंडनेर्ली तालुका करवीर येथील सुप्रसिद्ध शाहीर शंकर पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शाहिरी कार्यक्रमाच्या ठिकाणीच मृत्यू झाला. त्यामुळे ज्या कलेने उंची दिली, मानसन्मान दिला , जीवनाला आधार दिला त्याच कलेने शेवटच्या श्वासापर्यंत साथ देत जगाचा निरोप घेतानासुद्धा साथ दिली. असं मरण शाहीर पाटील यांच्या वाटणीला काल आलं त्यामुळे शाहीर विश्वास शंकर पाटील यांची मनाला चटका लावणारी एक्झिट झाली आहे.
दिंडनेर्ली येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शंकर पाटील यांनी शाहिरी कला जोपासत महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या तीन राज्यांमध्येआपल्या शाहीरी कलेच्या माध्यमातून एक वेगळा दबदबा निर्माण केला होता समाजप्रबोधनात्मक शाहिरी कला करून त्यांनी व्यसनमुक्ती असेल किंवा शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसार असेल या माध्यमातून त्यांनी तीन राज्यांमध्ये कार्यक्रम करून एक नामवंत शाहीर म्हणून नावलौकिक मिळविला होता.
1975 मध्ये आकाशवाणी केंद्रावरून शाहिरी सादर करणारा पहिला शाहीर म्हणून त्यांना मान मिळाला होता. शाहिरांना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळावी पाठबळ मिळावे म्हणून त्यांनी आपल्या गावी नेताजी सुभाषचंद्र बोस शाहिरी परिषदेचे सुद्धा त्यांनी स्थापना केली होती. लक्ष वेधी पहाडी आवाज, रसिकांना मंत्रमुग्ध करणारी मांडणी, विषयाचा गाढा अभ्यास, मराठमोळी चाल ही त्यांच्या शाहिरीची वैशिष्टे होती . त्यामुळे शाहिर शंकर पाटिल यांचा पोवाडा म्हटल की त्यांच्या चाहत्यांची तोबा गर्दी ही त्याची खासियत शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिली आहे.
स्वतः व्यसनापासुन बाजूला जाऊन व्यसमुक्तीच्या प्रभोधनासाठी शासनाच्या विविध कार्यक्रमांतून पोवाडा सादर करून त्यांनी महाराष्ट्र गाजवला होता त्यामुळे शाहिरी क्षेत्रामध्ये शंकर पाटील यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
वयाची ऐंशी वर्षे पूर्ण होऊनसुद्धा त्यांनी शाहिरी सोडली नव्हती. कोरोनाच्या महामारीमध्ये गेली सात महिने त्यांचे कार्यक्रम बंद होते. काल त्यांचे दोन कार्यक्रम होते. हुपरी आणि कुंभोज या ठिकाणी दोन कार्यक्रम होणार होते. पहिला कार्यक्रम दिला होता दुपारी एक वाजता हुपरी येथील कार्यक्रमस्थळी व्यासपीठावर चढतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते गतप्राण झाले.
‘ती’ मरेपर्यत माझ्यासोबत असणार ..
शाहीर शंकर पाटील आपल्या सहकार्यांसमवेत एका टेम्पोतून हुपरीकडे चालले होते. टेम्पोमध्ये त्यांनी आपल्या मांडीवर हार्मोनियम घेतली होती त्यांच्या सहकार्याने त्यांना अण्णा पेटी खाली ठेवा. असं म्हटल्यावर कलेचा उपासक अण्णा आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला ती पेटी कशी खाली ठेवू ती तर मरेपर्यंत माझ्या सोबत राहणार आहे आणि खरोखरच त्या पेटीने अण्णांची साथ शेवटच्या श्वासापर्यंत सोडली नाही ..