बेलवडे बुद्रुक येथील बैठकीत डॉ. अतुल भोसले यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी / कराड
कृष्णा कारखाना ही संस्था गेले अनेक वर्षे राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून काम करणारी संस्था आहे. याठिकाणी सभासदांचे हित हा एकमेव उद्देश डोळ्यांसमोर ठेवून कारभार केला जातो. याठिकाणी कधीही राजकीय डावपेच केले नाहीत. ही संस्था राजकारण विरहीत सुरु राहिली पाहिजे, या विचारातून चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी कार्यरत राहून, नेहमीच सर्व सभासदांना समान न्याय देण्याची भूमिका घेतली आहे, असे प्रतिपादन कृष्णा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केले.
कराड तालुक्यातील बेलवडे बुद्रुक व परिसरातील सभासद संपर्क बैठकीत ते बोलत होते. कारखान्याचे संचालक लिंबाजीराव पाटील, गिरीश पाटील, दिलीपराव पाटील, डॉ. संपतराव मोहिते, माजी सरपंच बाबूराव यादव, शिवाजीराव थोरात, माजी उपसरपंच संभाजीराव मोहिते, हर्षवर्धन मोहिते, ऍड. भारत मोहिते, राजाराम मोहिते, महेश मोहिते, झुंजार मोहिते उपस्थित होते.
डॉ. भोसले पुढे म्हणाले, की गेल्या पाच वर्षांत साखर उतारा सर्वाधिक राहिला आहे. कारखान्याच्या आधुनिकीकरणामुळे आज कारखाना 9000 हजार मेट्रिक टनापर्यंत गाळप करतो. भविष्यात 12 हजार मेट्रिक टन गाळप क्षमता करण्याचे नियोजन आहे. राजकारणात वेगवेगळे मतप्रवाह असतात, पण सहकारात मात्र सभासद कल्याण हाच एकमेव उद्देश असतो. या हेतूने सहकार टिकविण्यासाठी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पासाहेब कार्यरत राहिले. तोच वसा आणि वारसा जोपासत डॉ. सुरेशबाबा कार्यरत आहेत.
लिंबाजीराव पाटील, डॉ. संपतराव मोहिते, सरपंच डॉ. सुशांत मोहिते, महेंद्र कांबळे, अँड. भारत मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. आनंदराव मोहिते यांनी प्रास्ताविक केले. प्रदिप मोहिते यांनी आभार मानले.