अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली घोषणा : प्रत्येकी 10 हजार रु. याप्रमाणे तीन प्रयोगांसाठी मिळेल साहाय्य
प्रतिनिधी /मडगाव
प्रसिद्ध तियात्रिस्ट प्रिन्स जेकब यांनी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांच्या तियात्र आणि नाटकांचे प्रयोग पुन्हा सुरू करण्यासाठी मदत करण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. कोविडमुळे गेल्या दोन वर्षांपासून तियात्र व नाटकांचे प्रयोग झालेले नाहीत. त्यामुळे सरदेसाई यांनी थिएटर शुल्क भरण्याच्या बाबतीत कलाकारांना मदत करण्याच्या दृष्टीने तीन प्रयोगांसाठी 30 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. प्रत्येक प्रयोगासाठी 10,000 रु. दिले जातील. अशा प्रकारे तीन प्रयोगांना ही मदत दिली जाणार असल्याचे गोवा फॉरवर्डकडून घोषित करण्यात आले आहे.
मागील चार दशकांपासून तियात्र क्षेत्रात सेवा देणारे तियात्रिस्त प्रिन्स जेकब यांनी शुक्रवारी फातोर्डा येथील गोंयकार घरमध्ये गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्यासह पत्रकार परिषदेला संबोधित केले आणि सांगितले की, कलाकारांना त्रास होत असल्याने तियात्रांची सुरुवात होणे आवश्यक आहे.
सरकारने गेल्या जूनमध्ये कलाकारांना एकाचवेळी 10 हजार रु. मदत देण्याची घोषणा केली होती. सरकारने आता सभागृहाच्या 50 टक्के क्षमतेवर तियात्र आणि नाटकाचे प्रयोग पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र भाडे माफ करण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे सरदेसाई म्हणाले. मी तियात्रिस्त आणि नाटय़कलाकारांना माझ्या वेतनातून मदत करून पाठिंबा देईन असे जाहीर केले होते. मी इतर आमदारांनाही आपापल्या मतदारसंघात असेच करण्याचे आवाहन केले होते. मला वाटते की, आमच्या सर्व आमदारांनी हे अत्यंत गंभीरपणे घेतले पाहिजे, असे ते म्हणाले.
वचन दिल्याप्रमाणे मदत
वचन दिल्याप्रमाणे रवींद्र भवन किंवा इतर सभागृहांचे भाडे देण्यासाठी तियात्र किंवा नाटय़दिग्दर्शकाला 10 हजार रु. देण्यात येतील. अशा तीन प्रयोगांसाठी मी प्रत्येक दिग्दर्शक किंवा निर्मात्याला मदत करेन, असे सरदेसाई यांनी सांगितले. तियात्र ही आमची ओळख आहे. तियात्र आणि नाटकाद्वारे हे कलाकार केवळ समाजाला चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करत नाहीत, तर ते आमचे मनोरंजन देखील करतात. हे खूप महत्त्वाचे आहे, असे सरदेसाई म्हणाले.
चिंता असती, तर रवींद्र भवन सभागृह मोफत दिले असते
रवींद्र भवनाच्या अध्यक्षांना जर तियात्रिस्तांची काही चिंता असती, तर त्यांनी त्यांच्यासाठी सभागृह मोफत दिले असते. नवनवीन राजकीय पक्ष गोव्यात येत आहेत आणि गोव्याच्या लोकांनी मागणी केलेली नसतानाही वचने देत आहेत. परंतु गोव्यातील कलाकारांच्या संदर्भात चिंता व्यक्त करण्यात ते अपयशी ठरले आहेत, असे सरदेसाई म्हणाले.
प्रयोगात हस्तक्षेप होणार नाही : प्रिन्स जेकब
गेल्या दोन वर्षांपासून कोणीही तियात्रिस्तांबद्दल चिंता व्यक्त केलेली नाही. कलाकारांना मदत केल्याबद्दल मी विजय सरदेसाई यांचा खरोखर आभारी आहे, असे जेकब म्हणाले. सरदेसाई या उपक्रमातून कोणतेही राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तियात्रिस्त आणि नाटय़कलाकार ही मदत घेऊ शकतात. आम्ही वचन देतो की, आम्ही तुमच्या प्रयोगात हस्तक्षेप करणार नाही. तुम्ही माझ्यावर किंवा विजय सरदेसाई यांच्यावर देखील गाणे सादर करू शकता, असे जेकब म्हणाले. सरकार आणि राजकारणी त्यांच्या मदतीसाठी पुढे आले नाहीत. कारण तियात्रिस्त त्यांच्या कृत्यांवर टीका करतात. तियात्राद्वारे आम्ही फक्त हे दर्शवितो की, कोणी कुठे आपली चूक सुधारायला हवी. आमची टीका सकारात्मक पद्धतीने घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.