प्रतिनिधी /काणकोण
तुळशी विवाहासाठी लागणाऱया साहित्याने चावडी, काणकोण येथील बाजार फुलून मध्येच येणाऱया पावसाने मात्र विक्रेत्यांची धांदळ उडविल्याचे दिसून आले. या तालुक्यातील काही भागांत 15 रोजी तुळशी विवाहाचा सण साजरा करण्यात आला, तर काही भागांत 16 रोजी साजरा करण्यात येणार आहे. सुवासिनींच्या दृष्टीने हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सुवासिनी महिला तुळशी विवाहाच्या दिवशी जोडवी पेटवत असतात.
या सणासाठी लागणारे ऊस, चिंच, आवाळे, जिन्याच्या काठय़ा, केळीची पाती, झेंडूची फुले, तुळशीची कणसे, केळीची पाने, सुपाऱया त्याचबरोबर पुका, काटेकणगा, आंबाडे, अळवाच्या माडय़ा यासारखे साहित्य घेऊन चावडीवरील बाजारात विक्रेत्यांनी आणि ते खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली. या तालुक्यातील विशेषता आदिवासी समाजातील महिला विक्रेत्या नेहमीप्रमाणे या बाजारात सहभागी झाल्या. सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे ग्राहक देखील या वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी करत होते. अन्य वस्तूंसाठी चावडीवरील गोवा बागायतदार भवन, अन्य किराणामालाच्या दुकानांत गर्दी उसळली होती. मात्र ऐनवेळी आलेल्या पावसामुळे उघडय़ावर मांडलेल्या वस्तू झाकून ठेवण्यासाठी विक्रेत्यांची तारांबळ उडाली, तर खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी देखील नाराजी व्यक्त केली. गतसाली कोरोना महामारीमुळे हा सण अत्यंत मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला होता. सध्या कोरोना महामारी ओसरल्यामुळे आनंदात असलेल्या भाविकांची ऐनवेळी आलेल्या पावसामुळे विरजण पडल्यागत परिस्थिती झाली.